रस्त्यावरील खडीमुळे अपघातांना निमंत्रण

रस्त्यावरील खडीमुळे अपघातांना निमंत्रण
Published on

रस्त्यावरील खडीमुळे अपघातांना निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : शहरात रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यासोबतच काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. ही कामे झाल्यानंतर रस्त्यांची झाडलोट करण्यात येत नाही. परिणामी कामांसाठी वापरली जाणारी सिमेंट मिश्रित बारीक खडी रस्त्यावर पसरली आहे. या खडीवरून वाहने घसरल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याविषयी नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असून, या रस्त्यांची झाडलोट होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्याने यंदा वाहनचालकांची खड्ड्यांतून सुटका झाली आहे; मात्र अद्याप काही रस्त्यांची कामे शिल्लक असल्याने या ठिकाणी खड्ड्यांचा सामना वाहनचालकांना करावा लागणार आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच पेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्यानंतर त्या रस्त्याची झाडलोट करण्यात येत नाही. वाहनांच्या वर्दळ तसेच पावसामुळे सिमेंट वाहून गेले असून, त्यातील बारीक खडी ही रस्त्यावर इतस्ततः पसरली आहे. या खडीवरून वाहन चालविणे म्हणजे जिकिरीचे झाले आहे. दुचाकीस्वार या खडीवरून घसरून पडत असून, अपघात होत आहेत. काही ठिकाणी तर दररोज एक तरी दुचाकीस्वार खडीमुळे घसरून पडल्याच्या घटना घडत आहेत; मात्र एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येत असून, त्यांच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही.

स्वच्छतेसाठी चेन्नई पॅटर्न
एकीकडे पालिका प्रशासन शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न मिटवण्यासाठी तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी चेन्नई पॅटर्न कल्याण-डोंबिवली शहरात राबवित आहे; मात्र दुसरीकडे शहरातील साधे रस्ते झाडले जात नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करतात. स्वच्छता तर दूर राहिली. किमान रस्त्यांची दररोज झाडलोट व्हावी, जेणेकरून धुळीचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा एकीकडे नागरिक करत आहेत; मात्र त्यांच्या पदरी केवळ निराशा पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, या रस्त्यांची झाडलोट केली जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com