

शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड
ठाणे, ता. ११ (बातमीदार) : मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे ठाण्यातील बाजारपेठांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः ठाणे स्थानक परिसर, गावदेवी, मार्केट आणि स्टेशनजवळील छोट्या-मोठ्या स्टेशनरी व पुस्तक दुकानांत ग्राहकांची झुंबड उडालेली दिसत आहे.
नवीन वह्या, पाठ्यपुस्तके, कंपास बॉक्स, दप्तरे, पेन, पेन्सिल, शार्पनर, रंगीत पेन्सिली, ड्रॉइंग बुक्स, क्राफ्ट पेपर, डायरी आणि इतर अनेक वस्तू घेण्यासाठी दुकानांमध्ये रांगा लागलेल्या दिसत आहेत. यंदा महागाईमुळे अनेक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक वर्गातील म्हणजे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या पुस्तक संचाची किंमत सुमारे ८०० ते १,२०० रुपये दरम्यान आहे, तर पाचवी ते सातवीसाठी १,२०० ते १,८०० रुपये आणि आठवी ते दहावीचा पुस्तक संच २,५०० रुपयांपर्यंत जात आहेत. वह्यांची किंमतदेखील वाढली असून १०० पाने वह्यांसाठी ३० ते ४५ रुपये तर २१० पाने वह्यांसाठी ६० ते ८० रुपयांपर्यंत दर आकारले जात आहेत.
पालकांवर आर्थिक ताण
पालक महागाईमुळे चिंतेत असून, एका विद्यार्थ्यासाठी सरासरी २,५०० ते ४,००० रुपयांपर्यंत खर्च येतो. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट ब्रँडच्या वह्या, डायऱ्या व गणिती साधने वापरण्याचे बंधन घातल्यामुळे पालकांवर आर्थिक ताण येत आहे.
मोटू-पतलूची क्रेझ
यंदा विद्यार्थ्यांमध्ये ‘छोटा भीम’, ‘मोटू-पतलू’, ‘स्पायडरमॅन’, ‘एल्सा’, ‘क्रिकेटपटू’, ‘रेसिंग कार्स’ अशा विविध प्रकारच्या वह्यांची विशेष क्रेझ पाहायला मिळत आहे. याशिवाय विविध रंगांचे, आकर्षक असलेले कंपास व पेन्सिल बॉक्स, बॅग्स आणि पाण्याच्या बाटल्या बाजारात उपलब्ध आहेत. काही कंपास बॉक्स तर यूएसबी चार्जिंग किंवा डिजिटल टायमरसह उपलब्ध आहेत. म्हणजे शालेय साहित्य आता केवळ शिकवण देणारेच नाही, तर स्टायलिश गॅझेट्ससारखेही बनले आहेत.
ऑनलाइन खरेदीला पसंती
काही पालकांनी शैक्षणिक साहित्य ऑनलाइन खरेदीचा पर्याय निवडला आहे. त्यामध्ये सूट, होम डिलिव्हरी आणि वेळ वाचवण्याचे फायदे सांगितले जातात; मात्र अनेक पालक प्रत्यक्ष दुकानात जाऊन साहित्य बघून घेणे, मुलांना सोबत नेऊन त्यांच्या पसंतीनुसार वस्तू घेणे पसंत करतात. काही मोठ्या स्टेशनरी दुकानांनी ‘बॅक टू स्कूल’ ऑफर्स सुरू केल्या आहेत, जसे की १० टक्के सूट, एकावर एक वह्या फ्री, पेनच्या बॉक्सवर भरीव सवलती दिल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी विशेष फलक लावले आहेत.
शेवटच्या आठवड्यात विक्रमी गर्दी
मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी थोडीशी विक्री कमी भासत असली तरी शेवटच्या आठवड्यात झालेली गर्दी ही विक्रमी आहे. शाळा सुरू होण्याआधीच्या शेवटच्या चार-पाच दिवसांत खरेदीचा जोर वाढतो, असे शैक्षणिक साहित्य विक्रेते ज्ञानेश्वर कदम यांनी म्हटले आहे.
वस्तूंच्या किंमती (प्रतिनग रुपयांत)
कंपास बॉक्स ७० ते २५०
पेन १० ते ६०
पेन्सिल ५ ते २०
रबर ५ ते १५
शार्पनर १० ते २५
स्केच पेन १५० ते ४००
वॉटर कलर १५० ते ४००
दप्तर ४०० ते १,२००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.