शेणात मुलगी रुतली
शेणात रुतली मुलगी
डोंबिवली पूर्वेतील घटना; जागरूक नागरिकांनी वाचविले
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरातील गोशाळा येथील प्रकाश विद्यालयासमोर जमा केलेल्या शेणात एक मुलगी फसल्याची घटना मंगळवारी (ता. ११) घडली. या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच जागरूक नागरिकांनी प्रसंगावधान राखत मुलीला सुखरूप बाहेर काढले. येथील गोठ्याबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून शेण जमा असून, दलदलसदृश परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे. येथून हा गोठा हटविण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरातील प्रकाश विद्यालयासमोरील गोशाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शेण जमा झालेले आहे. अनेक वर्षांपासून येथे शेण जमा होत आहे. काही नागरिक त्या ठिकाणी कचरा, घरातील निर्माल्य आणून टाकत असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. मंगळवारी या परिसरातून एक लहान मुलगी जात होती. तेथून जात असताना तिच्या अंगावर एक गाय धावून आली. तिच्यापासून वाचण्यासाठी मुलीने रस्ता बदलण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या ठिकाणी रस्ता नव्हता, तर शेणाचा चिखल होता. त्यात तिचा पाय रुतल्याने त्या शेणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; मात्र शेणाचा खड्डा एवढा मोठा झाला आहे की त्यात ती आणखीनच फसत होती. त्या ठिकाणाहून जात असलेले जागरूक नागरिक नितीन कदम आणि एक महिला तिच्या मदतीसाठी धावून गेले. त्यांनी तिला सुखरूप बाहेर काढले.
पालिका प्रशासनाकडे तक्रारी
संबंधित गोठ्यासंदर्भात अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्याची माहिती माजी नगरसेवक मनोज घरत यांनी दिली. संबंधित जागा ही मुंबई गोग्रास भिक्षा संस्थेची असून, त्यांनीही गोठ्यावर कारवाईबाबत पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. फ प्रभाग क्षेत्र अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने मुलगी या शेणात रुतल्याची घटना घडली. एखादा मोठा अपघात झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही. याविषयी ठोस कारवाई न केल्यास मनसे स्टाइलने जाब विचारला जाईल, असे घरत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.