हक्काच्या पैशांसाठी हेलपाटे

हक्काच्या पैशांसाठी हेलपाटे
Published on

भरत उबाळे ः सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ११ : आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांचे भात एकाधिकार पद्धतीने घेतले आहे. या बदल्यात मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या बँक खात्यात जमा होणार होती. दरम्यान, तीन महिने लोटले तरी शहापूर तालुक्यातील १,५०० शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शासनाने भाताला हमीभाव देऊन बोनस देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बाजारपेठेतील खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत अधिक दर मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी महामंडळाच्या खरेदी केंद्रांवर भातविक्री केली. परंतु खरेदी केंद्रावरील प्रक्रियेनंतर तब्बल एक हजार ५०० शेतकऱ्यांना अद्याप मूळ विक्री रक्कम मिळालेली नाही. तसेच जाहीर केलेला बोनस देण्यात आलेला नाही. परिणामी बियाणे, खते, शेतीच्या मशागतीसाठी लागणारा खर्च करणे शेतकऱ्यांना अशक्य होऊन बसले आहे. मेच्या सुरुवातीलाच अवकाळी पाऊस आणि त्यानंतर जूनमध्ये मॉन्सूनचे आगमन झाल्यामुळे खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. परंतु उत्पन्नाअभावी थकीत रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. महत्त्वाचे म्हणजे ट्रॅक्टर भाड्याने घेणे, बियाणे खरेदी करणे, खते मिळविणे यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागते. दरम्यान, बँकांमध्ये हेलपाटे घालूनही विक्री केलेल्या भाताची रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
--------------------------------------
बोनस फक्त कागदावरच
शासनाने दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. हमीभाव दोन हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला असून, बाजार भावाच्या तुलनेत हा पर्याय नक्कीच चांगला आहे. परंतु, मूळ विक्री रक्कमच शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही, तेव्हा बोनस फक्त कागदावरच उरतो, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. शासनाकडून बोनस जाहीर करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या हाती कधी पडणार, याचा काही निश्चित अंदाज नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
---------------------------------
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थकीत रक्कम जमा करण्याची आणि बोनसही वितरित करण्याची गरज आहे अन्यथा खरिपाची तयारी करणे कठीण होईल.
- शिवराम घाटाळ, शेतकरी, आवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com