

संगीता खरातप्रकरणी डॉक्टरवर कारवाईची मागणी
वाशी (बातमीदार) ः वाशी येथील रुग्णालयात १८ एप्रिल रोजी संगीता खरात या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेची प्रसूती नॉर्मल पद्धतीने झाल्यांनतर प्रकृती स्थिर होती, मात्र काही काळांनंतर तिची प्रकृती बिघडली व तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला. हा प्रकार डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे तसेच पालिकेत अनुभवी किंवा वरिष्ठ डॉक्टर नसल्यामुळे झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांसह शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी नवी मुंबई युवासेना जिल्हाप्रमुुख अनिकेत म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे, तर आयुक्तांनीदेखील या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून, यामध्ये जे. जे. रुग्णांच्या तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली असल्याचे सांगण्यात आले आहे. या वेळी नवी मुंबई युवासेना उपाध्यक्ष साईनाथ वाघमारे, बेलापूर शहर अध्यक्ष नयन पाटील, ऐरोली शहर अध्यक्ष चेतन पाटील, सरचिटणीस जयदीप नामदास, राजेश मोरे आदी उपस्थित होते.
..........
लिंबूच्या भावात घसरण
वाशी (बातमीदार) ः पावसाला सुरुवात झाल्याने लिंबाचे भाव कमी झाले आहे. त्यानुसार किरकोळ बाजारात १० रुपयात पाच लिंबू उपलब्ध होऊ लागले आहेत. उन्हाळ्यात लिंबांना जास्त मागणी असते. शिवाय लिंबाची बाजारात होणारी आवकही कमी होते. त्यानुसार लिंबाचे भाव वाढतात. सरबत, शाकाहारी, मांसाहारी जेवणात लिंबाचा वापर केला जातो. त्यामुळे लिंबांना वर्षभर मागणी असते. फेब्रुवारीपासून लिंबाचे भाव वाढायला सुरुवात झाली होती. त्यामुळे बाजारात एका लिंबासाठी पाच रुपये मोजावे लागत होते. मोठे लिंबू १० रुपयांना मिळत होते. घाऊक बाजारातच लिंबू २५० ते ४५० रुपये शेकडा असा भाव झाला होता. आता लिंबाचे भाव उतरले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक भाजीपाला बाजारात आंध्र प्रदेश, नगरमधून आठ ते १० गाड्या बाजारात दररोज येत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात लिंबू १०० ते २०० रुपये शेकडा या भावाने मिळत आहेत. येत्या काही दिवसांत ही आवक वाढून भाव आणखी खाली येतील अशी, आशा व्यापारी व्यक्त करीत आहेत.
..................
शिरवण्यात विविध धार्मिक कार्यक्रम
तुर्भे (बातमीदार) ः शिरवणे येथील श्री गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गणेश मंदिराचा १५ वा वर्धापनदिन आणि पालखी सोहळा शुक्रवार (ता. १३) व शनिवार (ता. १४) रोजी विविध धार्मिक, विधिवत पूजापाठ करून साजरा केला जाणार असल्याचे माजी महापौर व ट्रस्टचे सचिव जयवंत सुतार यांनी सांगितले. शुक्रवार सकाळपासून श्री गणेश याग प्रारंभ, मुख्यदेवता, अग्नी, नवग्रह देवता स्थापना तसेच विविध धार्मिक पूजापाठ होणार आहेत. सायंकाळी गावदेवी प्रासादिक भजन मंडळ, (रोहिंजन) सुनील पाटील बुवा यांचे सुश्राव्य भजन तर रात्री हभप शारदा सूर्यवंशी जाधव (नाशिक) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी विविध धार्मिक पूजा आणि महाआरती, दुपारी श्री विष्णूलक्ष्मी प्रासादिक महिला भजन मंडळ (दापोली-पारगाव) गायिका स्नेहल पाटील यांचे सुश्राव्य भजन, तर दुपारी ठाणे-बेलापूर पंचक्रोशीतून स्वयंभू गणेश दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी हनुमान प्रासादिक भजन मंडळ, शिरवणे बुवा नंदकुमार सुतार व देवेंद्र पवार यांचे भजन होणार असून, सायंकाळी श्री गणेश पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव ठाकूर, सचिव जयवंत सुतार यांनी सांगितले आहे.
...............
नेरूळच्या छत्रपती शाहू महाराज उद्यानातील खेळणी गायब
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर-८ मधील छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक उद्यानातील खेळणी आणि इतर साहित्य गायब झाले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी दोन शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक तैनात असूनही ही खेळणी गायब झाली कशी, असा सवाल स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक उद्यानात मोठ्या प्रमाणात लहान मुलांसह पालक गर्दी करतात. शिवाय परिसरातील मुख्य उद्यान असल्याने सारसोळे, नेरूळ सेक्टर-२, ८ व १० येथील नागरिक याचा वापर करतात. मोठ्या संख्येने येथे सकाळी आणि संध्याकाळी विरंगुळा करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक हजेरी लावतात. या उद्यानात व्यायामासाठी असलेली महागडी साहित्य तसेच विविध प्रकारची खेळणी पालिकेने बसवली आहेत, मात्र ही खेळणी गेल्या काही दिवसांपासून उद्यानातून गायब झाली आहेत. या ठिकाणी दोन शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक तैनात असतानाही महागडी साहित्य गायब झाली कशी, याबाबत स्थानिकांकडून सवाल केला जात आहे. पालिकेने याची दखल घेऊन उद्यानातील खेळणी व व्यायामाचे साहित्य पुन्हा बसवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.