

लोहमार्ग पोलिसांच्या मागणीला ‘रेल्वे’ची नकार घंटा!
मुंब्रा लोकल अपघातप्रकरणी जखमींचे जबाब नोंदवणे सुरू
पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : मुंब्रा-दिवा येथे झालेल्या अपघाताची रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. याचदरम्यान लोहमार्ग पोलिसांनी काही तांत्रिक बाबींची माहिती रेल्वे प्रशासनाकडे मागितली आहे; मात्र ती माहिती अद्यापही रेल्वेने दिली नसल्याचे लोहमार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. शिवाय, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचे जबाब नोंदवणे सुरू केले आहे. त्यामधील काही प्रवाशांनी दोन्ही लोकलचे डबे एकमेकांना घासल्याचे म्हटले आहे. तर याव्यतिरिक्त प्रत्यक्षदर्शी आणि जखमींना रुग्णालयात घेऊन येणाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचेही लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान सोमवारी (ता. ९) सकाळी रेल्वे लोकलमधून पडून चौघांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. यामध्ये याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद केली गेली, तसेच रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरू असून अपघाताच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रेल्वे प्रशासन व लोहमार्ग पोलिसांकडून दोन्ही रुळांतील अंतर मोजण्याचे काम सुरू होते. तर तिसऱ्या दिवशी मुंब्रा रेल्वेस्थानकात ‘आरपीएफ’ तैनात होते. हा अपघात कसा, कशामुळे झाला याचा तपास दोन्ही यंत्रणा करीत आहेत. तसेच त्या दृष्टीने तांत्रिक बाबीही तपासल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अपघात झाला त्या वेळी असलेल्या प्रत्यक्षदर्शी लोकांची आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन येणाऱ्या मंडळींचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
स्थानकाजवळच ५०चा आकडा असलेला बोर्ड
दिव्याकडून मुंब्रा रेल्वेस्थानकावर येण्यापूर्वीच एका खांबावर ५०चा आकडा असलेला बोर्ड दिसत आहे. याबाबत पोलिसांनी विचारणा केल्यावर मुंब्रा रेल्वेस्थानक मॅनेजर यांनी तो लोकल गती किती असावी, याचा आकडा असल्याचे म्हटले आहे. तसेच तो रेल्वेमार्फत लावण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
..
तांत्रिक बाबींची विचारणा
अपघाताच्या तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेच्या तांत्रिक बाबींबाबत विचारणा केली आहे. यामध्ये रेल्वे रुळामधील किती अंतर असते, तसेच दोन ट्रॅकमध्ये किती अंतर असावे, याशिवाय गाड्यांची गती किती असावी, आदी माहिती रेल्वे प्रशासनाला विचारली आहे; मात्र ती अद्यापही रेल्वेने दिली नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
लोहमार्ग पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुधारक शिरसाट यांनी सांगितले, की ‘जखमींचे जबाब नोंदवणे सुरू आहे. जे जबाब नोंदवले गेले आहेत त्यामधील काहींचे म्हणणे आहे, की दोन्ही लोकलचे डबे एकमेकांना घासले गेल्याने हा अपघात झाला आहे; मात्र तपास पूर्ण झाल्यावर नेमका अपघात कसा झाला हे समजू शकेल. याशिवाय तांत्रिक बाबींची माहिती रेल्वेकडे मागितली आहे. ती माहिती अद्याप मिळालेली नाही.’
सर्व जखमींची प्रकृती स्थिर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : मुंब्रा येथील लोकल अपघातात जखमी झालेल्या आठ जणांवर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान सोमवारी सकाळी घडलेल्या रेल्वे दुर्घटनेत चार प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले. तर, आठ जखमी प्रवाशांवर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन रुग्णांवर मंगळवारी हाडाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच उर्वरित रुग्णांवर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र बुधवारी कोणत्याही जखमी रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली नसून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर या रुग्णांना सोडण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.