

मोखाडा, ता. ११ (बातमीदार) : डहाणू-जव्हार-मोखाडा-त्र्यंबकेश्वर हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र आणि गुजरात यांना जोडणारा मार्ग आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ आहे. या मार्गावर रात्री-अपरात्री मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारी आहे, मात्र तोरंगण, अंबोली व निळमाती घाटात वाहनांवर दगडफेक होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या दगडफेकीत काही वाहनचालक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या घाटमार्गावर पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
डहाणू-जव्हार-मोखाडा-त्र्यंबकेश्वर या मार्गावर मोठ्या संख्येने वारकरी, भक्त आणि औद्योगिक सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते. या मार्गावर मोखाडा-त्र्यंबकेश्वरदरम्यान तोरंगण, अंबोली आणि निळमाती गावानजीक घाटाचा रस्ता आहे. त्यामुळे वाहनांच्या अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. अपघात टाळण्यासाठी वाहनचालक या घाटात वाहने सावधगिरी बाळगून वाहने हळूवार चालवत असतात. त्याचा फायदा घेत वाहन लुटारू वाहनांवर दगडफेक करून चालकांना जखमी करून वाहनातील माल लुटण्याचा प्रयत्न करत आहेत.
यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्याला पायबंद बसावा, म्हणून त्या वेळी मोखाडा पोलिसांनी या घाटात गस्त वाढवली होती, मात्र अलीकडच्या काळात या घाटात पुन्हा वाहनांवर दगडफेकीचे सत्र सुरू झाले आहे. त्यामध्ये भाजीपाला वाहतूक करणारा एक चालक जखमी झाला होता. तसेच काही वाहनचालकांनी दगडफेकीतही आपला जीव आणि मालाचे रक्षण करून वाहने शिताफीने येथून हाकून, माल इच्छीतस्थळी पोहोचवला आहे.
अनेक वेळा आमच्या वाहनांवर गाडीतील माल लुटण्यासाठी घाटात दगडफेक केली जाते. काही दिवसांपूर्वीच पालघरचा वाहनचालक या दगडफेकीत जखमी झाला होता. त्याने जखमी अवस्थेत वाहन आणि मालाचे रक्षण करून येथून पलायन केले. माझ्या वाहनांवरही अनेक वेळा दगडफेक झाली आहे. त्यामध्ये मी बचावलो आहे. त्यामुळे या घाटात पोलिसांची गस्त असणे आवश्यक आहे.
- गोविंद पागी, वाहनचालक, डहाणू
आमच्याकडे वाहनांवर दगडफेकीची तक्रार आलेली नाही, मात्र अशा घटना घडत असतील, तर आम्ही आता सुरू असलेली गस्त अधिक वाढवून आणि वाहनांना संरक्षित करून त्यांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करू.
- कार्तिक कडु, पोलिस उपनिरीक्षक, मोखाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.