शिंदे सेनेची मोर्चेबांधणी सुरू
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ : आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत. ही बाब लक्षात घेता, नवी मुंबईतील शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या पक्षप्रवेशामुळे शिंदे सेनेकडे भाजपपेक्षा सर्वाधिक जास्त माजी नगरसेवकांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास चर्चेकरिता मंत्री गणेश नाईकांपेक्षा बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना अधिक पसंती दिली जात असल्याचे समजते आहे.
नवी मुंबईतील शिवसेनेच्या शिंदे गटात आणि मंत्री गणेश नाईक यांच्यात फारसे सौख्य नसल्याचे सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकांमुळे नाईक समर्थकांवर काम न केल्याच्या आरोपांमुळे दोन्ही पक्षांमध्ये कडवटपणा निर्माण झालेलाच आहे. हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली. ऐरोलीमध्ये गणेश नाईकांविरोधात शिंदे गटाचे विजय चौगुले यांचे बंड आणि बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंविरोधात भाजपचे माजी नेते संदीप नाईक यांनी केलेल्या बंडामुळे शिंदे सेना आणि गणेश नाईकांमध्ये असलेला विरोध आता टीपेला पोहोचला आहे. बेलापूरमध्ये शिंदे सेनेच्या नेत्यांनी मंदा म्हात्रेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून मदत केली. त्याची फलश्रुती म्हणून अतिशय अटीतटीच्या लढतीत मंदा म्हात्रे यांचा विजय झाला. विधानसभेत झालेल्या या झुंजी अद्यापही नेत्यांच्या मनातून गेलेल्या नाहीत. या राजकीय वादाचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकीत उमटण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या शिंदे सेनेच्या युवा पदाधिकारी आणि मुख्य पदाधिकाऱ्यांनी बैठकांना सुरुवात केली आहे. युती झाल्यास भाजपला कोणत्या जागा आणि शिंदे सेनेला कोणत्या जागा द्यायच्या यावर प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली आहे. तिकीट वाटपात स्थानिक नगरसेवकांचा दावा अधिक असणार आहेच; पण निवडून येण्याची शक्यता अधिक असणाऱ्यांनाच उमेदवारी देण्याचा नियम भाजपमध्ये आहे. त्या अनुषंगाने भाजपमध्येही अंतर्गत तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेत बाहेरून आलेले नगरसेवक आणि सध्याचे स्थानिक नगरसेवक यांची संख्या पाहता सर्वाधिक जागा असल्याने नाराजी नाट्य निर्माण होऊ नये, याकरिता शिंदे सेनेच्या नेत्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना तिकीट वाटपात अग्रस्थानी ठेवण्यासाठी पसंती दिल्याचे समजते.
-------------------------------
शिंदे गटाची ताकद वाढली
शिंदे सेनेकडे आधीचे नगरसेवक आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशानंतर नगरसेवकांची ताकद वाढली आहे. सुरुवातीला शिंदे गटाकडे १८ जणांनी प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवारांचे झालेले पानिपत पाहता पुन्हा काही माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी विधानसभेच्या तोंडावर शिंदे गटामध्ये सहा जणांनी प्रवेश केला. सध्या ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाकडे ३७ माजी नगरसेवकांची ताकद होती. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा १२ माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे ही संख्या वाढली आहे.
-----------------------------------
सध्याच्या परिस्थितीत नवी मुंबईत सर्वाधिक जास्त नगरसेवक असणारा शिंदेंचा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. लोकसभा आणि विधानसभेनंतर आमच्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे महापालिकेच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी आम्ही सुरुवात केली आहे. तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत प्रत्येकाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यादेखील आमच्यासोबतच चर्चेला होत्या.
- किशोर पाटकर, नवी मुंबई जिल्हाप्रमुख, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.