वडिलांच्या निर्णयामुळे गवसला आशेचा ‘किरण’

वडिलांच्या निर्णयामुळे गवसला आशेचा ‘किरण’

Published on

वडिलांच्या निर्णयामुळे गवसला आशेचा ‘किरण’
मुलुंडमध्ये वडिलांच्या किडनीमुळे मुलाचे प्राण वाचले
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) : मुलुंडमधील एका ६५ वर्षीय वडिलांनी आपल्या मुलाला किडनीदान करून त्याचे प्राण वाचवल्याची हृदयस्पर्शी घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे एका कुटुंबाचे त्याग, अफाट प्रेम आणि कौटुंबिक ऐक्य समाजासमोर आले आहे. किरण कुमटे एका बँकेत काम करीत घराला आधार देत आहे. डिसेंबर २०२३मध्ये तो अचानक एका गंभीर आजाराने ग्रस्त झाला. त्यानंतर मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजी कन्सल्टंट डॉ. वैभव केसकर यांच्याकडे त्याची तपासणी झाली. त्या वेळी दोन्ही किडन्या काम करीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या वेळी त्यांनी किरणला तत्काळ किडनी प्रत्यारोपण करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला. या घटनेमुळे कुटुंबावर मानसिक आणि आर्थिक संकट ओढावले.
किरणच्या शारीरिक तक्रारीमुळे आणि किडन्या काम करीत नसल्यामुळे वडील ज्ञानेश्वर कुमटे यांनी किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या वयामुळे आणि आरोग्याच्या दृष्टीने काही शंका उपस्थित झाल्या, परंतु वैद्यकीय तपासणीत त्यांना अवयव दानासाठी योग्य ठरवण्यात आले आणि किरणवर डॉ. केसकर आणि त्यांच्या चमूने यशस्वीरीत्या प्रत्यारोपण केले.
या गंभीर रुग्णावर उपचार करणारे डॉ. वैभव केसकर यांनी सांगितले, ‘‘किरणच्या स्थितीमध्ये उच्च रक्तदाब, डायलिसिसची गरज आणि क्षयरोगाचा प्रसार अशी गुंतागुंत होती. पण कुटुंबाच्या धाडसी निर्णयामुळे वेळेवर प्रत्यारोपण शक्य झाले.’’
---------------------------------
अवघड काळात कुटुंब खंबीर
किरणचा लहान भाऊ आनंद यांनी सांगितले, ‘‘वडील अजूनही सक्रिय आहेत आणि त्यांच्या निर्णयाने आम्हा सर्वांना नवसंजीवनी मिळाली आहे.’’ प्रत्यारोपणाच्या काळात कुटुंब खंबीरपणे उभे राहिले. विशेष म्हणजे लहान भावाने आपल्या नोकरीचा राजीनामा देत सर्व वैद्यकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या. मित्र, नातेवाईक आणि किरणच्या कंपनीनेही आर्थिक मदतीत हातभार लावला.
-----------------------
किरण आणि त्यांचे वडील यांची प्रकृती आज स्थिर आहे. किरण लवकरच कामावर रुजू होणार आहे. ही घटना केवळ प्रत्यारोपणाची नसून, एका वडिलांच्या अपार प्रेमाची आणि एका कुटुंबाच्या अखंड ऐक्याची जिवंत साक्ष आहे. एका वडिलांनी आपल्या धाडसी निर्णयाने आपल्या मुलाला पुनर्जन्म दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com