आशा व अंगणवाडीसेविका फसव्या कॉलर्सच्या जाळ्यात!
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : सरकारी योजनांचा लाभ मिळवून देतो, असे सांगून महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत स्वतःला डॉक्टर म्हणणाऱ्या बोगस कॉलर्सने आता आशासेविका व अंगणवाडीसेविका कार्यकर्त्यांनाही फसवण्याचा नवा सापळा रचला आहे. दिल्ली आणि मुंबईहून आलेल्या या बोगस कॉल्समुळे उल्हासनगरमध्ये चिंता वाढली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महिला व बालविकास, जेएसवाय, पीएमएमव्हीवाय अशा सरकारी योजनांच्या नावाने कॉल करणारे फसवेखोर, आशा वर्कर किंवा अंगणवाडीसेविका कार्यकर्त्यांना संपर्क करून लाभार्थ्यांची माहिती मागतात. त्यानंतर संबंधित लाभार्थीलाही फोनवर कॉन्फरन्स कॉलद्वारे जोडले जाते आणि त्या दोघांमध्ये संवाद घडवून आणत विश्वास संपादन केला जातो. एकदा विश्वास बसल्यावर लाभार्थीला एका बनावट लिंकवर क्लिक करण्यास सांगून ओटीपी मागितला जातो. ओटीपी मिळताच काही सेकंदांतच बँक खात्यातून पैसे गायब होतात. या प्रकारांमध्ये सर्वसामान्य महिला लाभार्थी आणि कार्यकर्त्यांना दोष देण्याचा प्रकारही समोर येत आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण तयार होत आहे. उल्हासनगर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी नागरिकांना आवाहन करत सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
महिला व बालविकास योजनांच्या नावाने सायबर फसवणुकीचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून लाभार्थी संवाद साधतात आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी कॉल्स किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये. फसवणूक रोखण्यासाठी जागरूकता हाच सर्वोत्तम उपाय आहे. महापालिका स्तरावरूनही सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारांवर कठोर कारवाईसाठी पोलिस आणि सायबर विभागाशी समन्वय साधला जात आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
सावधगिरी हाच उपाय
सायबर फसवणुकीमुळे सर्व नागरिक, विशेषतः महिला लाभार्थी व आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याची गरज आहे. एक चुकीचा निर्णय आर्थिक नुकसान तर करतोच; पण सेविकांवरही नाहक दोष येतो. त्यामुळे प्रत्येकाने जागरूकता ठेवून आपली आणि इतरांचीही सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
फसवणुकीची यंत्रणा कशी चालते?
* दिल्ली व मुंबईहून बनावट कॉल येतात.
* कॉल करणारे स्वतःला डॉक्टर किंवा अधिकृत प्रतिनिधी म्हणून सादर करतात.
*|महिला व बालकल्याण योजना,जेएसवाय, पीएमएमव्हीवाय यांसारख्या योजनांच्या नावाने माहिती विचारली जाते.
* कॉलद्वारे लाभार्थीला कॉन्फरन्सवर घेत विश्वास संपादन केला जातो.
* लाभार्थीला एक बनावट लिंक पाठवून ओटीपी विचारला जातो.
* ओटीपी दिल्यानंतर थेट बँक खात्यातून पैसे गायब होतात.
महत्त्वाच्या सूचना
* अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलवर विश्वास ठेवू नका.
* बँक खात्याची माहिती, ओटीप, आधार क्रमांक किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणालाही सांगू नका.
* कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
* अशा प्रकारची घटना घडल्यास तत्काळ स्थानिक आरोग्य अधिकारी, पोलिस अथवा सायबर गुन्हे शाखेला कळवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.