तलावातील मासेमारीच्या निविदेची प्रतीक्षा

तलावातील मासेमारीच्या निविदेची प्रतीक्षा
Published on

कामोठे, ता. १६ (बातमीदार) : तत्कालीन पनवेल नगर परिषदेच्या कार्यकाळातील मासेमारीकरिता सुरू असलेली निविदा प्रक्रिया महापालिकेच्या कार्यकाळात बंद आहे. त्यामुळे तलावातील मासेमारीवर निर्भर असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.
पनवेल महापालिकेच्या मालकीचे देवाळे, कृष्णाळे, लेंडाळे, वडाळे आणि इस्रायली तलावांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या तलावांच्या अस्तित्वामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. वडाळे तलावाच्या सुशोभीकरणामुळे तलाव परिसरात नागरिकांची गर्दी होत आहे. तलावातील कमळ फुले, स्थानिक व स्थलांतरित पक्षी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. पर्यटनस्थळ म्हणून वडाळे तलाव विकसित होत आहे. तत्कालीन नगर परिषद कार्यकाळात प्रकल्पग्रस्त नागरिक पालिकेचे तलाव मासेमारीसाठी निविदेद्वारे घेत होते. या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळत होता. तलावांची साफसफाई, देखभाल व किरकोळ डागडुजी केली जायची. आता मात्र महापालिकेच्या स्थापनेनंतर पूर्वापार चालत असलेली निविदा प्रक्रिया बंद आहे.
--------------------
तलावातील माशांची चोरी
प्रकल्पग्रस्त गणेश वाघीलकर यांनी महापालिकेला निवेदनाद्वारे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना तलाव मासेमारीकरिता उपलब्ध करून देण्याची सातत्याने मागणी केली आहे. काही तलावांमध्ये चोरीने मासेमारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मासे चोरी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी वाघीलकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने केली होती; मात्र याबाबत महापालिकेने उचित कारवाई केली नसल्याचे वाघीलकर यांनी सांगितले. महापालिकेच्या मालकीचे तलाव प्रकल्पग्रस्तांना मासेमारीकरिता निविदा प्रक्रियेद्वारे देण्याचे धोरण अद्याप निश्चित झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
------------
महापालिकेचे तलाव प्रकल्पग्रस्तांना मासेमारीकरिता उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली पाहिजे. अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.
- गणेश वाघीलकर, स्थानिक प्रकल्पग्रस्त
---------------------
केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील सर्व तलावांचे टप्प्याटप्प्याने सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. तलाव मासेमारीकरिता देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निश्चित धोरण नाही.
- डॉ. वैभव विधाते, उपायुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com