पूर नियंत्रण रेषा अटी शर्थींसह उठणार?

पूर नियंत्रण रेषा अटी शर्थींसह उठणार?
Published on

बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुरबाड मतदारसंघातील विविध प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यासह बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि शहरातील भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. बैठकीत बदलापूर व संपूर्ण मुरबाड मतदारसंघात, प्रस्तावित प्रकल्प; तसेच आवश्यक विकासकामांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने उल्हास नदी पूर नियंत्रण रेषा ही काही अटी व शर्थींसह शिथिल करून नवीन पूरनियंत्रण रेषा आखण्यासंदर्भात आणि इतर विकासकामांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला.
आमदार किसन कथोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यात बदलापूर शहरातील दत्त चौक बेलवली ते समर्थ चौक बॅरेज रोडपर्यंत रेल्वेमार्गाला समांतर पूल, प्रस्तावित टाटा पॉवर उपकेंद्रात जागा उपलब्ध करून मंजुरी देणे, बदलापूर शहरातील खासगी मिळकतींवर शाळेच्या बांधकामांबाबत, तसेच इंदगाव, बेंडशीळ, नंबरवाडी आणि मामणोली या चार लघुपाटबंधारे प्रकल्पांना एमएमआरडीएकडून निधी मंजूर करून देणे, बेलवली-कात्रप रेल्वे पूल, बदलापूर सॅटिस प्रकल्प, बॅरेज रोड ते होप इंडिया रेल्वे पूल, कांजूरमार्ग, ऐरोली, शिळफाटा, काटई ते बदलापूर मेट्रो प्रकल्प निविदा निघाल्यानंतर काम लवकर सुरू करण्याबाबत, तसेच उल्हास नदी पूरनियंत्रण रेषा अटी व शर्थींसह नव्याने आखणे, त्याचबरोबर मुरबाड तालुक्यात काळू धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन आणि पॅकेज, मुरबाड तालुका दिवाणी न्यायालयीन नवीन इमारत, कुशिवली धरण, बदलापूर पूर्व व पश्चिम पोलिस ठाणे, टोकावडे आणि टिटवाळा ग्रामीण पोलिस ठाणे या जुन्या इमारतींची पुनर्बांधणी करून नवीन इमारत उभारणे आणि कर्मचारी वसाहत बांधणे, बदलापूर शहरातील मोडकळीस आलेले क्रीडा संकुल उभारणे, नाट्यगृहाची निर्मिती करणे या संदर्भात सकारात्मक चर्चा होऊन निधी व लवकरात लवकर कामांच्या निविदासंदर्भात निर्णय घेण्यात आले. पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, भाजप शहराध्यक्ष किरण भोईर, रमेश सोळसे, माजी नगरसेवक शरद तेली, अण्णा कुलकर्णी उपस्थित होते.

समस्या मार्गी लागणार
मुरबाड मतदारसंघातील या महत्त्वांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन आढावा बैठकीचे आयोजन केले. आता लवकरच या विकासकामांना बदलापूर शहरातून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे बदलापूरकरांच्या सगळ्याच समस्या मार्गी लागणार आहेत, असे आमदार कथोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com