विवळवेढे उड्डाणपुलाला तळ्याचे स्वरूप

विवळवेढे उड्डाणपुलाला तळ्याचे स्वरूप

Published on

विवळवेढे उड्डाणपुलाला तळ्याचे स्वरूप
अपघातात चालक गंभीर जखमी, वाहतूक ठप्प

कासा, ता. १६ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात रविवारी (ता. १५) संध्याकाळी पडलेल्या जोरदार पावसात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे (महालक्ष्मी) येथील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुलाच्या मध्यभागी पावसाचे पाणी साचल्याने त्यास तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. परिणामी दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक काही काळासाठी थांबवावी लागली. या अडथळ्यामुळे एक भीषण अपघात घडला असून, एका ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली आहे.

उड्डाणपुलाचे काँक्रीटीकरण करताना योग्य पद्धतीने उतार, निचरा मार्ग व सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. पुलाच्या वळणावर खोलगट भाग तयार झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. निचऱ्याची व्यवस्था नसल्याने संपूर्ण पूल जलमय झाला होता. महामार्ग प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू केले; मात्र यासाठी कोणतीही पूर्वतयारी नसल्याचे स्पष्ट झाले.

साचलेल्या पाण्यातून संथगतीने वाहने जात होती. या वेळी मुंबईकडून भरधाव येणाऱ्या एका ट्रकने समोरील वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून, त्याचा एक पाय मोडल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी कासा पोलिस व महामार्ग प्रशासनाने तातडीने धाव घेत जखमीला कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. अपघातग्रस्त वाहन बाजूला केले तरी रात्री उशिरापर्यंत वाहतूक संथगतीनेच सुरू होती.

विवळवेढे उड्डाणपुलावरच नव्हे, तर तवा, सोमटा, चिंचपाडा, आंबोली येथील उड्डाणपुलखालीदेखील पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सेवा रस्ते आणि मुख्य महामार्गात निचऱ्याची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी सहज साठते. यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. त्यात धानिवरी येथील पुलावर फक्त एकेरी वाहतूक सुरू आहे. येथेही मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतूक कोंडीची शक्यता आहे.

गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम करताना जुन्या डांबरी रस्त्यावरच थेट सिमेंट काँक्रीट टाकले आहे. पहिल्या पावसातच उड्डाणपुलांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी पावसात मोठे अपघात व वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. उड्डाणपुलांच्या गुणवत्तेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आता कुठे पावसाला सुरुवात झाली असून, पहिल्याच पावसात महालक्ष्मी उड्डाणपुलावर महामार्ग प्राधिकरणाने नीट लक्ष न दिल्याने पाणी साचले आहे. अनेक उड्डाणपुलांखाली पाणी साचत आहे. त्याचबरोबर सेवा रस्त्यांतील मधल्या जागेतदेखील पाणी साचून वाहनचालकांना त्रास होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत.
- संतोष देशमुख, अध्यक्ष, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट

ज्या ठिकाणी पुलावरील काम अपूर्ण आहे ते करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठीदेखील उपाययोजना केल्या जातील.
- सुहास चिटणीस, प्रबंधक - महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com