चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

Published on

पनवेल, ता. १६ (बातमीदार) : शाळेत पहिल्यांदाच पाय ठेवणारे नवे चेहरे अन् दीड महिन्याच्या सुट्टीनंतर आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटणारे विद्यार्थी, वर्गांची सजावट, रांगोळी आणि ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांच्या स्वागताने गाव, वाड्या, शहरातील शाळांचा परिसर गजबजून गेला होता. त्याच वेळी नेहमी आईला बिलगून असणारी चिमुकली मुले आज पहिल्यांदाच शाळेत जाताना हिरमुसली होती. पनवेल तालुक्यातील शिवकर शाळेने बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून प्रवेशोत्सव केला. आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
गेल्या दीड महिन्यापासून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शांत असलेल्या शाळांमध्ये आजपासून पुन्हा किलबिलाट ऐकायला मिळाला. पनवेलमध्ये प्राथमिक व माध्यमिक दोन्ही विभागांच्या २४६ शाळा आजपासून सुरू झाल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांनी दिली. विद्यार्थ्यांना शाळा आनंददायी वाटावी, यासाठी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याचबरोबर पनवेल महापालिकेच्या शाळांमधूनही प्रवेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली. शाळांमधून नवीन गणवेश, नवीन पुस्तक वाटप असे उपक्रम राबवण्यात आले; तर खासगी शाळांमधून आधीच गणवेश व पुस्तके देण्यात आल्याने खासगी इंग्रजी शाळांमधील मुले गणवेशात आली होती. तब्बल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये ‘कहीं खुशी तर कहीं गम’ असे वातावरण होते. काही विद्यार्थ्यांमध्येही कमालीची उत्सुकता व हुरूप दिसून येत होता; तर काही लहानग्यांनी मात्र रडून गोंधळ घातला होता.
----------------
पान-फुलांची तोरणे अन् रांगोळ्या
नवे शैक्षणिक वर्ष, नवा गणवेश, नवीन पुस्तके, नवा अभ्यासक्रम, नवे वर्गशिक्षक, नवीन वह्या, वेळापत्रक अशा विविध बाबी जाणून घेऊन विद्यार्थी घरी जाताना पालकांना बडबड करीत सांगत होते. यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाने करण्यात आले. नवीन वर्षात विद्यार्थी शाळेत येताच त्यांना प्रसन्न वाटावे, यासाठी शाळांनी सजावटीवर भर दिला होता. यासाठी शाळा परिसर स्वच्छ करणे, सडा, रांगोळी, फुला-पानांची तोरणे, पताका बांधून वर्गखोल्या सुशोभित करण्यात आल्या होत्या.
----------------
लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची भेट
शाळा प्रवेशोत्सवाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्यासह तालुक्यातील सरकारी अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. शाळेचा पहिला दिवस म्हणजेच शिक्षणाच्या प्रवासाचा पहिला टप्पा गोड, प्रेरणादायी आणि संस्मरणीय करण्यासाठी जिल्हा परिषदेने या उपक्रमाचे आयोजन केले. स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये हजेरी लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
-----------------
आई, तू पण इथेच थांब ना!
कळंबोली येथील सुधागड शाळच्या गेटवर एक चिमुकला पहिल्यांदाच शाळेत गेला. वातावरण पाहून मनात भीती असलेला तो, ‘आई चल ना आपल्या घरी’ असे म्हणत हिरमुसला होता. त्यानंतर त्याच्या आईने त्याची समजूत घालत, ‘अरे मी इथेच बसते बाळा गेटवर. घरी जाणार नाही. तू बस शाळेत, तुला खाऊ देतील बाई;’ पण काहीसा बावरलेला तो मुलगा ‘तू पण चल आत माझ्यासोबत’ असे म्हणून आईला बिलगला आणि मोठ्याने रडू लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com