शाहिरी लोककलेला उज्वल भवितव्य!
शाहिरी लोककलेला उज्ज्वल भवितव्य!
कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचा विश्वास
शिवडी, ता. १६ (बातमीदार) ः कला कोणतीही असो, नृत्य, अभिनय किंवा गायकी, तिच्याशी कामगार कल्याण मंडळाचे नेहमीच अतुट नाते राहिले आहे. लोकमानसातून निर्माण झालेल्या शाहिरी लोककलेचे सातत्य असेच टिकून राहिले तर तिला निश्चितच उज्ज्वल भवितव्य आहे, असा विश्वास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी येथे लोककलेचे प्रणेते स्व. मधुशेठ नेराळे यांच्या जन्मदिनी बोलताना व्यक्त केला.
लोककलेच्या अस्तित्वासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडणारे स्व. मधुशेठ नेराळे यांचा जन्मदिन सोमवारी (ता. ९) लालबागच्या न्यू हनुमान थिएटर, मंगल कार्यालयात पार पडला. शाहिरी लोककला मंच आणि नेराळे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले होते. या औचित्याने भव्य शाहिरी मेळावा पार पडला. मेळाव्याला मुंबईबाहेरील कलावंतांनी मोठी उपस्थिती लावली होती. लोककलेचे तपस्वी स्व. मधू नेराळे यांच्या प्रतिमेला प्रथम कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.
भव्य शाहिरी मेळाव्याचे उद्घाटन करताना कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी कलेवर नितांत प्रेम करणाऱ्या शाहिरी लोककलावंतांचे अभिनंदन केले. याप्रसंगी ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे, नगरसेवक सुनील गणाचार्य, कामगार कल्याण मंडळाच्या मुंबई विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त डॉ. घनश्याम कुळमेथे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, वरळीतील सार्वजनिक उत्सवाचे आयोजक, कामगार नेते राजन (भाई) लाड, शाहीर रुपचंद चव्हाण, हर्षला आशीष मोरे अशा कला, राजकीय क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित होती. प्रास्ताविक लोकप्रिय शाहीर आणि संस्थेचे सरचिटणीस मधू खामकर यांनी केले. तर अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण यांनी आभार मानले. शाहीर शांताराम चव्हाण, दत्ता ठूले, मधू खामकर, आनंद सावंत तसेच गायक अविरत साळवी, धीरज पारकर, गीता गोलांबरे यांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.