रानसई धरणाच्या पाणीपातळीत वाढ

रानसई धरणाच्या पाणीपातळीत वाढ
Published on

रानसई धरणाच्या पाणीपातळीत वाढ
दोन दिवसांची पाणीकपात रद्द; उरणकरांना दिलासा
उरण, ता. १६ (वार्ताहर) ः मागील काही दिवसांपासून उरण तालुक्‍यात चांगला पाऊस झाला. त्‍यामुळे उरण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. धरण परिसरात ६५ मिमी पावसाची नोंद झाल्याने पाणीपातळी १०३ फुटापर्यंत वाढली आहे. त्‍यामुळे दोन दिवस असणारी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून घेण्यात आला आहे.
उरण शहर, २१ ग्रामपंचायती आणि काही प्रकल्पांना रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो; मात्र मेमध्ये रानसई धरण क्षेत्राची पाणीपातळी कमालीची खालावली होती. त्‍यामुळे एमआयडीसीकडून दोन दिवस पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. याबद्दल उरणवासीयांकडून रोष व्‍यक्‍त केला जात होता. त्‍यामुळे धरणातील गाळ काढून त्‍याची पाणी क्षमता वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. दरम्यान, मेमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. या वेळी तालुक्‍यात चांगला पाऊस झाला. त्‍यानंतर पावसाने उघडीप घेतली; मात्र पुन्‍हा दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांत धरण क्षेत्रात ६५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्‍यामुळे धरणाची पाणीपातळी अगदी १०३ फुटापर्यंत पोहोचली आहे. धरणाची उंची ही ११६ फुटांपर्यंत आहे. त्‍यामुळे पुढचे काही दिवस असाच मुसळधार पाऊस पडत राहिला तर धरण लवकरच ओव्हरफ्लो होईल, अशी माहिती देण्यात येत आहे. त्‍यामुळे उरणकरांवरील पाणीसंकट दूर होण्यास मदत होणार आहे.
..................
उरण तालुक्यासह येथील मोठ्या प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी १९७०च्या दशकात रानसई धरण बांधण्यात आले होते. रानसईच्या निसर्गरम्य अशा डोंगर कपारीत हे धरण बांधले आहे. सुमारे ६.८ चौरस किलोमीटर क्षेत्रात हे धरण आहे. या धरणात दहा मिलियन क्युबिक मीटर पाणी साठविण्याची क्षमता होती; मात्र आता सात मिलियन क्यूबिक मीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.
उरणकरांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दररोज हेटवणे पाणीपुरवठा योजनेतून चार एमएलडी पाणी घ्यावे लागत आहे. उरणच्या वाढत्या औद्योगिकीकरणासाठी रानसई धरणाची उंची वाढविणे गरजेचे असणार आहे.
..................
रानसई धारणाची पाणीपातळी १०३ फुटांवर गेली आहे. त्यामुळे आम्ही दोन दिवसांची पाणीकपात बंद केली आहे.
- जी. एम. सोनावणे, उपअभियंता, एमआयडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com