जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
Published on

ठाणे, रायगड जिल्ह्यांना झोडपले

जनजीवन विस्कळित; नद्यांची पातळी वाढल्याने प्रशासन सतर्क

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे, रायगड जिल्ह्यांत सोमवारी (ता. १६) सकाळपासूनच मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले. रायगड जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना धोक्याचा इशारा दिला आहे. अंबा नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने पहिल्याच दिवशी परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे तीन ते चार दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासांत ३५.६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. ठाणे तालुक्यात सर्वाधिक ५५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. सोमवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरात सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. शाळेचा पहिला दिवस असल्याने पालकांची विद्यार्थ्यांना शाळेत नेताना तारांबळ उडाली. तसेच रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. उल्हासनगरात पूल कोसळून ५०० घरांचा संपर्क तुटला आहे, तर बाळेगाव येथे दोन घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
डोंबिवली शहरात अनेक सखल भागांत, रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण झालेल्या भागात पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. उल्हास नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली असून पाऊस सुरूच राहिल्यास नदी लवकरच धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. रविवारी संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वादळ वारा व पाऊस चालू असताना नावडीचा पाडा (रांजणगाव) येथील राहुल शिवराम पवार व अलका अशोक पवार यांच्या राहत्या दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
----
उल्हासनगरमध्ये पूल कोसळला
उल्हासनगर कॅम्प नंबर पाच येथील गणेशनगर परिसरातील नाल्यावर असलेला पूल कोसळल्याची घटना घडली आहे. यात एक महिला आणि लहान मुलाचा जीव थोडक्यात वाचला. हा पूल कोसळल्यामुळे ५०० पेक्षा अधिक घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
.............................................
ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ५९ टक्के पाऊस
ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी १६ जून २०२४ रोजी सरासरीच्या ३४ टक्के इतका पाऊस झाला होता. यंदा याच कालावधीत पावसाची सरासरी ५९ टक्क्यांवर गेली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा २५ टक्के अधिक पाऊस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
..................................
ठाणे जिल्ह्यातील २४ तासांतील पाऊस
तालुका पाऊस मिमी
ठाणे ५५
कल्याण २७
मुरबाड ३३.७
भिवंडी ३३.४
शहापूर ३३
उल्हासनगर २०
अंबरनाथ ३३.१०
---
वसई-विरार, मिरा-भाईंदरमध्ये संततधार
पालघर जिल्ह्यातही पावसाने शहरी भागासह ग्रामीण भागाला झोडपून काढले. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे वसई-विरार, मिरा-भाईंदर परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे दोन्ही महापालिकांचे नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विवळवेढे उड्डाणपुलावर साचलेल्या पाण्यामुळे ट्रकला अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ वाहतूक थांबवावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com