रोहयोअंतर्गत १७०० ठिकाणी कामे सुरू
अलिबाग ता. १७ (बार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत १,७०७ कामे सुरू आहेत. या कामांमुळे ७३ हजार २५० मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत अधिक कामे सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागात नागरिक वीटभट्टी आणि अन्य कामांसाठी स्थलांतर करीत असतात. १०० दिवस कामाची हमी असणार्या रोजगार हमी योजनेचा स्थलांतर रोखण्यासाठी मदत झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीत गावागावातील बेरोजगारांवर घर सोडून परजिल्ह्यात जाण्याची वेळ येउ नये म्हणून रोहयोतून प्रशासनातर्फे कामे उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये घरकुल, शोषखड्डा, गुरांचा गोठा, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, विहीर, गाळ काढणे अशा कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यात मिळून १७०० कामे हाती घेण्यात आली आहेत.
२००८मध्ये सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केल्यांनतर आतापर्यंत रायगड जिल्ह्यात तीन लाख ७९ हजार ४०१ कामगारांनी आपली नोंद जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यामध्ये एक लाख ७५ हजार ३५८ महिला मजुरांचा समावेश आहे.
आतापर्यंत रायगड जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दोन लाख १ हजार १८३ कामगारांना जॉबकार्ड देण्यात आले आहे. या मजुरांमधील ५२ हजार ३८७ मजूर नियमित कामासाठी धावणारे आहेत. यामध्ये २३ हजार १५५ महिला मजुरांचा समावेश आहे. गेल्या वर्षी रोहयो अंतर्गत मजुरांना एका दिवसाची मजुरी २९७ रुपये देण्यात येत होती. यंदा ती ३१२ रुपये देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कामांचा आढावा
कामे मजुरांची संख्या
१. १६४७ घरकुले ः ६२ हजार ५९३
२. तीन ठिकाणी शोषखड्डा खणणे ः ११
३. १८ ठिकाणी गोठा बांधणे ः५५३
४. तीन ठिकाणी शेळीपालन शेड ः ४९
५. २ ठिकाणी कुक्कुटपालन शेड ः ४२
६. २३ विहिरींचे खोदकाम ः ६ हजार ४६३
७. चार ठिकाणी गाळ काढणे ः ३ हजार ४८०
८. ३ ठिकाणी बांबू लागवड ः ५८
९. तीन कामे यंत्रणा विभागः ५८
मजुरीत वाढ
आता रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांच्या रोजंदारीमध्ये १५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मजुरांना २९७ रुपयांऐवजी आता ३१२ रुपये मजुरी मिळणार आहे. रायगड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत जॉबकार्ड मिळविलेल्या आणि कार्यरत असलेल्या ५२ हजार ३८७ मजुरांनी १७०० कामांवर रोजंदारी करण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.