भाजप - शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर
भाजप-शिंदे गटात नाराजीनाट्य
समाजमाध्यमातील पोस्टमुळे वाद चव्हाट्यावर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : बहिणाबाई उद्यानाच्या परिसरात वाचनालय उभारणीच्या कामावरून शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता भाजपचीदेखील शिवसेना शिंदे गटाविरोधातील नाराजी उघड झाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांची समाजमाध्यमावरील ही नाराजीची पोस्ट व्हायरल होत आहे. मतलबी आणि स्वार्थी मित्रपक्षाचा जाहीर निषेध करतो, असे उघड उघड त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटल्याने डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर हे नाराजीनाट्य रंगताना दिसत आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सारे काही आलबेल नाही. लोकसभा निवडणूक काळात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करीत होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना येथील उमेदवारी मिळणार का, याविषयी साशंकता निर्माण झाली होती. भाजपने त्या वेळी असहकाराचा ठरावदेखील केला होता. यावरून शिंदे गट आणि भाजपमधील वाद उफाळून आला होता. विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश पाटील यांच्यात जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणावरून हा वाद पुन्हा पेटला होता. वरिष्ठ पातळीवर पक्षातील बडे नेते सारे काही सुरळीत सुरू असल्याचे भासवत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही मित्रपक्षांत वादाचे प्रसंग उद्भवत असतात. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. कामाच्या श्रेयवादावरून राजकीय पक्षांत कलगीतुरा रंगताना दिसत आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून ठाकरे गट आणि मनसेने कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. पलावा उड्डाणपुलाचे रखडलेले काम यातून त्यांची एकजूट दिसून आली आहे.
डोंबिवलीतील कवयित्री बहिणाबाई उद्यानाच्या परिसरात वाचनालयाची उभारणी केली आहे. या कामाची सुरुवात झाल्यानंतर या कामाला शिवसेना ठाकरे गटाने उद्यानाच्या जागेत वाचनालयाची उभारणी करण्यात येऊ नये, असे म्हणत या कामाला विरोध दर्शविला होता. या वाचनालयाची उभारणी झाली असून, आता भाजपचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी येथील नामफलकावरून शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची समाजमाध्यमावरील नाराजीची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मित्रपक्षाचा निषेध
वाचनालयावरील नामफलकाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करीत त्यांनी पोस्टमध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी पाहावे आणि विचार करावा, असे म्हणत महायुतीचा धर्म जसे आपण पाळतो तसे मित्रपक्ष युती धर्म निभावतात का, असा सवाल त्यांनी केला आहे. सुनीलनगर हा भाजपचे माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे व माजी नगरसेविका अलका म्हात्रे यांचा असून, या फलकावर कोठेही त्यांचे फोटो लावलेले नाहीत. माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या पत्नी व माजी नगरसेविका रंजना पाटील आणि माजी नगरसेवक रवि पाटील यांचा या प्रभागाशी काही संबंध नसताना त्यांचे फोटो का लावले आहेत, असा सवाल त्यांनी करीत मतलबी आणि स्वार्थी मित्रपक्षाचा जाहीर निषेध करतो, असे पोस्टद्वारे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.