भूसंपादनासाठी २२,२५० कोटी मिळणार
उरण, ता. १८ (वार्ताहर) : महामुंबईच्या दळणवळणात क्रांतिकारी ठरणाऱ्या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरच्या भूसंपादनास लवकरच गती मिळणार आहे. निधीअभावी या मार्गाचे अवघे ३२ टक्केच भूसंपादन झाले आहे. उर्वरित ६८ टक्के भूसंपादन रखडल्याने हा मार्ग अनेक वर्षांपासून कागदावरच आहे. आता राज्य सरकारने या मार्गाच्या भूसंपादनासाठी आवश्यक २२ हजार २५० कोटींचे कर्ज हुडकोकडून घेण्यास हमी घेतल्याने भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर हा मार्ग वसई, भिवंडी, कल्याण आणि पेण परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसीसह वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल ही महानगरे, जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या आर्थिक वर्षात एमएमआरडीए, मेट्रोसह इतर अनेक विकास प्रकल्पांसाठी विविध वित्त संस्थांकडून कर्ज घेण्यात आले होते. कर्ज उभारणीची मर्यादा ओलांडल्यामुळे विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी हमी देण्यास राज्य सरकारने नकार दिला होता. आता एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्याने हुडकोकडून राज्य सरकारने २२,२५० कोटींच्या कर्जाची हमी घेतली आहे.
------------------
असा असेल कॉरिडॉर
विरार-अलिबाग कॉरिडॉर हा मार्ग वसई येथील राष्ट्रीय महामार्ग आठवरील नवघरपासून पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलवली गावादरम्यान असेल. मार्गात आठ इंटरचेंज, २८ वाहन अंडरपास, १६ पादचारी अंडरपास, १२० कल्व्हर्टसह संपूर्ण मार्ग आठपदरी असणार आहे. त्यासाठी २१ उड्डाणपूल, पाच बोगदे, ४० मोठे आणि ३२ लहान पूल प्रस्तावित आहेत.
-----------------
५५ हजार कोटींहून अधिक खर्च अपेक्षित
विरार-अलिबाग कॉरिडॉर मार्गासाठी ५५ हजार कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. यातील एकट्या भूसंपादनासाठीच २२,२५० कोटी लागणार आहेत; मात्र भूसंपादन झालेले नसतानाच विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मार्गाच्या निविदा काढल्याने टीका होत होती. अखेर फडणवीस सरकारने या निविदा रद्द करून हा मार्ग बीओटीवर बांधण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.