जिल्हयात सुमारे ३५ ब्लॅक स्पाॅट

जिल्हयात सुमारे ३५ ब्लॅक स्पाॅट

Published on

महामार्गावर ३५ अपघातप्रवण ठिकाणे
पावसाळ्यात वाहने जपून चालवण्याचे पोलिसांचे आवाहन

अलिबाग, ता. १८ (बार्ताहर)ः पावसाळा सुरू झाल्‍याने धबधबे प्रवाहित झाले असून पर्यटकांचा ओघ वाढला आहे; मात्र अनेकदा वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात होतात. मुसळधार पावसात महामार्गावर दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता निसरडा होणे, खड्डे पडणे आदी समस्या उद्‌भवतात. परिणामी, अपघाताच्या घटना घडून जीवितहानी होते. हे रोखण्याचे आव्हान संबंधित यंत्रणांपुढे असून चालकांनाही वाहने चालविताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्‍या आहेत. जिल्ह्यात ३५ पेक्षा जास्त ब्लॅक स्पॉट असून वाहतूक पोलिसांसह इतर यंत्रणेकडूनही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने या ठिकाणी वर्षभर पर्यटक येत असतात. पावसाळ्यात जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांसह धबधबे, घाटमाथा, गडकिल्ले या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात; मात्र अतिउत्‍साहात, मद्यधुंद अवस्‍थेत वाहन चालवल्‍याने अपघात घडतात. यात अनेकांना जीव गमवावा लागतो तर काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळेच ब्लॅक स्पॉटसह इतर वेळीही नागरिकांनी वाहने चालविताना नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

धोकादायक ठिकाणे
मुंबई-गोवा व मुंबई-पुणे महामार्गावरील मिळून सात ठिकाणी ३५ पेक्षा जास्त धोकादायक ठिकाणे आहेत. पळस्पे येथे माडप बोगदा ते लोधिवली ब्रीज, रिसवाडी, कलोते, लोधिवली, तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा, बोरघाट-ढेकूण गाव ते पुणे-मुंबई मार्गावर आडोशी गाव, अंडा पॉइंट, खोपोली एक्झिट, वाकण-गडबड, डोलवी, पुरी, सुकेळी खिंड, महाड-रेपोली, लोणेरे, तळेगाव पेट्रोल पंप दोन्ही बाजू, टेमपाले- लाखपाले- पहाले, वीर, तासगाव, मुगवली, आशेने, लोहारे, कशेडी- धामणदेवी, चोळीई, भोस्ते घाट यासोबतच खंडाळा घाट, कशेडी घाट, बोरघाट, ताम्हिणी घाट, आंबेनळी घाट ही धोकादायक ठिकाणे असून याठिकाणी चालकांनी सावधगिरी बाळगावी, अशा सूचना पोलिसांकडून करण्यात आल्‍या आहेत.

सूचना व उपाययोजना
१. महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनासाठी रुग्‍णवाहिका, जेसीबी, हायड्रा ब्रेन, पुरेसे कर्मचारी वर्ग आदींची व्यवस्था २४ तास उपलब्ध.
२. आवश्यक ठिकाणी साइडपट्टी, पॅट आईज, पॅनकॉर मिरर, वेग मर्यादा दर्शविणारे फलक तसेच वाहतूक वळविलेल्या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले आहेत.
३. ऑईल गळतीवर उपाययोजना म्हणून वाळू ठेवण्यात आली आहे.
४. महामार्गालगत असलेल्या नाल्यांची सफाई.
५. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई.

वाहतुकीच्या नियमांबाबत वाहतूक शाखेच्या वतीने कायमच विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत असून नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईदेखील करण्यात येत आहे. पावसाळ्यात अपघातांचे प्रमाणही वाढते. अशा वेळी वाहनचालकांनीही जबाबदारीने वाहने चालवावीत, जेणेकरून अपघात होणार नाहीत.
- सोमनाथ लांडे, वाहतूक निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com