जिल्हा परिषद शाळांना पालकांची पसंती

जिल्हा परिषद शाळांना पालकांची पसंती

Published on

जिल्हा परिषद शाळांना पालकांची पसंती
इयत्ता पहिलीत ११ हजार विद्यार्थ्यांनाच प्रवेश

राहुल क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरी भागाप्रमाणे इंग्रजी मध्यमांकडे वाढता कल आहे. यामुळे त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्यावाढीवर होत आहे. याची दक्षता घेत, ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने दिशा उपक्रम, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून शाळा प्रवेश करून घेणे, नवसाक्षरता अभियान आदी उपक्रम हाती घेतले. त्याचा आता सकारात्मक परिणाम दिसत आहे. शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात ११ हजार ७९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा आता पालक व विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या एक हजार ३२८ शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची झालेली दुरवस्था, शिक्षकांची कमतरता, शैक्षणिक साहित्याची वानवा, तर दुसरीकडे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फुटलेले पेव, आकर्षक अशी शाळांमधील सजावट यामुळे त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्यावाढीवर होत आहे. जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या वाढविण्याबरोबरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून गेल्या काही महिन्यांपासून दिशा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दर महिन्याला ७२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोत.

प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर ओळखून त्याला वैयक्तिकृत शिक्षण दिले, तरच १०० टक्के मुलांचा विकास साधता येईल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रक्रियेतून जर विद्यार्थी सर्वस्तरापर्यंत पोहोचला तर त्याची वेगवेगळ्या सर्वांगीण विकासासह स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, अशा विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष दिले जाते. मराठी, इंग्रजी किंवा गणित अशा प्रत्येक विषयाचे सहा स्तर ठरविले आहेत. त्यामध्ये अक्षर, शब्द, वाक्य, परिच्छेद, गोष्ट आणि श्रुत लेखन असे स्तर आहेत. प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या स्तरावर आहे, याची चाचणी दर महिन्याला घेतली जाते. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्यासही मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला होता.

ठाणे जिल्हा परिषदेच्या मध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा सकारात्मक परिणाम होत आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील झेडपीच्या एक हजार ३२८ शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात शाळेच्या पहिल्या दिवशी राबविण्यात आलेल्या प्रवेशोत्सवात ११ हजार ७९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. यामध्ये सहा हजार ३९ विद्यार्थिनी तर, पाच हजार ७५३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विविध उपक्रम पालकांच्या पसंतीस उतरत असून त्यातून शाळांमध्ये प्रवेश घेणारी विद्यार्थी संख्यादेखील वाढत आहे.

ठाणे पालिकेच्या शाळांमध्ये ८३९ प्रवेश
ठाणे महापालिकेनेदेखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी कंबर कसली आहे. डिजिटल पद्धतीने व कृत्रिम अध्ययन (एआय) प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी पालिका क्षेत्रातील ठाणे पालिका प्राथमिक विभागाच्या १०३ शाळांमध्ये ८३९ नवीन विद्यार्थी दाखल झाल्याची माहिती ठाणे पालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हात्रे यांनी दिली.


विद्यार्थी प्रवेश संख्या
तालुका प्रवेश संख्या
कल्याण १,३१९
अंबरनाथ ८८६
मुरबाड ३,०८८
शहापूर ४,०४१
भिवंडी २,४५८
एकूण ११,७९२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com