कल्याण अवती-भवती
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या प्रभारीपदी केतन रोकडे
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक व ठाणे जिल्हा प्रभारीपदी कल्याण पूर्वेतील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते केतन रोकडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी केली.
सरकारकडून वेळोवेळी विकासनिधी जाहीर होत असतानाही अतिक्रमण व मालकी हक्काचा खटला न्यायप्रक्रियेत प्रलंबित असल्यामुळे कोणताही ठोस विकास होऊ शकत नाही. त्यामुळे हा खटला जिंकणे ही प्राथमिक आणि सामूहिक जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर गाव, शहर, तालुका, जिल्हा आणि राष्ट्रीय पातळीवर जनजागृतीसाठी अभियान राबवण्यात येणार आहे. या न्यायालयीन संघर्षात केतन रोकडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असून, आंबेडकरी चळवळीतील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
केतन रोकडे हे महाराष्ट्र वजन मापकाटे मंडळाचे माजी अध्यक्ष असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती (कल्याण पूर्व)चे संस्थापक अध्यक्ष, सार्वजनिक जयंती उत्सव समिती समता फेरी (कल्याण पूर्व)चे माजी अध्यक्ष प्रल्हाद सहादू रोकडे चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे संचालक या आणि अशा विविध सामाजिक- सांस्कृतिक संघटनांमध्ये कार्यरत आहेत. या निवडीबाबत केतन रोकडे हे कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या न्यायालयीन लढ्यात अधिक प्रभावी जनजागृतीसाठी ते कार्य करतील, असा विश्वास दादाभाऊ अभंग यांनी व्यक्त केला आहे.
.........................
ब्राह्मण महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव
कल्याण (वार्ताहर) : ब्राह्मण सभा क्रीडा समिती व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ संयुक्तिक गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला. सरस्वती प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दोन्ही संस्थांचे अध्यक्ष बापट तसेच सारंग केळकर यांनी प्रमुख वक्ते थत्ते यांचा सत्कार केला. त्यांचा परिचय अनिल कर्वे यांनी केल्यावर थत्ते यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार दोन्ही कमिटीमधील अध्यक्ष तसेच क्रीडा समितीचे अरुण कर्वे, प्रसाद काणे, पराग जोशी, विनायक भावे व महासंघाचे विजय चावरे, अरुण पाठक, सुधीर जोशी, विजय हंसवाडकर, महेश केळकर यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांनी केला. तर, सर्वेश साकोरकर व जितेंद्र नरेगळकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष बापट, प्रशांत दांडेकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सारंग केळकर, ज्येष्ठ सभासद विजय चावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
...........................
‘आठवणीतला पाऊस’मध्ये डोंबिवलीकर चिंब
कल्याण (वार्ताहर) ः केतकीच्या बनी तिथे, येरे घना येरे घना, भेट तिची माझी स्मरते, घन घन माला नभी दाटल्या, हे सावळ्या घना, अधीर मन झाले, मयुरा रे फुलवीत येरे पिसारा, निशाणा तुला दिसला ना या व अशा विविध भावगीते तसेच चित्रपटांमधील गाण्यांच्या पाऊस सादरीकरणांनी डोंबिवलीकरांना तृप्त केले.
स. वा. जोशी शाळेच्या संकुलात असणाऱ्या ब्लॉसम सभागृहामध्ये स्वर गंधार प्रस्तुत ‘आठवणीतला पाऊस’ या सदाबहार गाण्यांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत संयोजक उदय चितळे यांना तबल्यावर सुरेख साथ श्रीकांत राईलकर यांनी दिली. तर वेंकटेश कुलकर्णी यांनी तालवाद्यांचा मेळ उत्कृष्टरीत्या साधत ही मैफल संस्मरणीय केली. सुप्रिया माने, लता काळे, प्रसाद सावंत, ययाती पाठक, जयश्री खोपकर, प्रमोद मेहेंदळे, मीनाक्षी पाटील, संजय सावंत, सुरभी जोशी, अपूर्वा चितळे, विभावरी पाठक, विवेक याकुंडी या मंडळींच्या गाण्यांनी कार्यक्रमात बहार आणली. श्रोत्यांनी गर्दी करून मैफलीस चांगला प्रतिसाद दिला.
................
सार्वजनिक वाचनालय कल्याणचा आगळा-वेगळा उपक्रम
कल्याण (वार्ताहर) : येथील सार्वजनिक वाचनालय वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी सातत्याने उपक्रमशील असते. त्याच अनुषंगाने जागतिक पुस्तकदिनानिमित्त मुलांच्या सुट्टीच्या काळात १५ एप्रिल ते १५ जून या काळात वाचनालयाच्या सभासदांच्या पाल्यांसाठी मोफत बालसाहित्य सेवा देण्यात आली.
बालवय संस्कारक्षम असते. याच वयात वाचनसंस्कार रुजविणे गरजेचे असते. भ्रमणध्वनीच्या विळख्यातून मुलांना वाचनाची गोडी लागावी, हाच एकमेव विधायक हेतू डोळ्यांसमोर ठेवून ही सेवा देण्यात आली, असे मत वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी मांडले. या उपक्रमात ६० बालवाचकांनी बालसाहित्यातील विविध साहित्य वाचले. या उपक्रमाचा समारोप ज्येष्ठ व श्रेष्ठ वाचक राजेंद्र खाडीलकर यांच्या उपस्थितीत पार पाडला. पालकांनी वाचनालयाच्या वाचनवृद्धीच्या उपक्रमाचे कौतुक केले व बालसभासदत्व घेतले. याप्रसंगी वाचनालयाच्या उपाध्यक्षा आशा जोशी, वाचक, कर्मचारी, बालवाचक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.