रुग्णालयातील स्टंटबाजी मनसैनिकांच्या अंगलट

रुग्णालयातील स्टंटबाजी मनसैनिकांच्या अंगलट

Published on

नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याने शवागरातील मृतदेह कापडामध्ये बांधून देण्यासाठी दोन हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात घुसून त्यांच्याविरोधात बेकायदा आंदोलन करणे मनसैनिकांच्या अंगलट आले आहे. वाशी पोलिसांनी या मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाशीतील नवी मुंबई महापालिका रुग्णालयात शवागरातील मृतदेह कापडात व्यवस्थित गुंडाळून देण्यासाठी एका कंत्राटी कर्मचाऱ्याने मृताच्या नातेवाइकांकडून दोन हजार रुपये उकळले होते. हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यावर तत्काळ बडतर्फीची कारवाई केली होती; मात्र त्यानंतरदेखील मनसेचे कार्यकर्ते सागर विचारे, संजय शिर्के, सागर तांबे, संतोष मोतसिंग, संदेश खांबे, प्रवीण माने, शैलेश पाचंगे, अक्षय त्रिमुखे, संगीता वंजारे, दीपाली ढऊळ यांच्यासह इतर १० ते १५ मनसैनिकांनी कोणत्याही प्रकारे कायदेशीर परवानगी न घेता, तसेच पूर्वकल्पना न देता, बेकायदा जमाव जमवून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला.
-----------------------
दमदाटी करीत धक्काबुक्की
वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश म्हात्रे यांनी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्या मनसैनिकांना दिल्यानंतरदेखील त्यांनी डॉ. म्हात्रे यांना अर्वाच्य भाषेमध्ये दमदाटी करीत त्यांच्या अंगावर धावून गेले. सुरक्षा रक्षकांनी मनसैनिकांची अडवणूक केली असता, मनसैनिकांनी त्यांना व अधीक्षकांना धक्काबुक्की करून जबरदस्तीने त्यांच्या गळ्यात मृतदेहाला घालण्यात येणारा पांढऱ्या रंगाचा कपडा घातला. वैद्यकीय अधीक्षकांकडे राजीनामा देण्याची मागणी करीत त्यांना अर्वाच्य भाषा वापरून त्यांना अपमानित केले.
-----------------
बदनामीचा व्हिडिओ केला व्हायरल
मनसे कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा तयार केलेला व्हिडिओ प्रासरमाध्यमांना देऊन, तसेच समाजमाध्यमांवर प्रसारित करून डॉ. राजेश म्हात्रे यांची, तसेच नवी मुंबई महापालिका सार्वजनिक रुग्णालयाची बदनामी केली. या प्रकारानंतर डॉ. राजेश म्हात्रे यांनी वाशी पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार वाशी पोलिसांनी बेकायदा आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com