वारकऱ्यांची ‘भेटी लागी जीवा’
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : आषाढी एकादशीला आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन याची देही, याची डोळा घेण्यासाठी पनवेल, नवी मुंबई परिसरातील शेकडो दिंड्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पनवेल शहराला संतांचा मोठा वारसा लाभलेला आहे. पनवेल तालुक्यातून सुमारे पाच हजारपेक्षा जास्त वारकरी, टाळकरी वारीच्या दिशेने पदक्रमण करीत आहेत; तर नवी मुंबई शहरातील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ या भागातून हजारोंच्या संख्येने वारकरी पायी जाणाऱ्या दिंड्यांमध्ये सहभागी झाले आहेत.
मुंबईच्या जवळ असणारे पनवेल शहर हे पूर्वीचा ग्रामीण भाग होता. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचा प्रचार या परिसरात झाला आहे. पनवेल शहरातून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत. तालुक्यातील अनेक गावांतील वारकरी मंडळी दिंड्यांमध्ये सहभागी झाले आहेत. पनवेल तालुक्यातील आदई गावातून गेल्या अनेक वर्षांपासून पायी दिंडी निघते. पनवेलकरांचे श्रद्धास्थान असलेल्या बल्लाळेश्वर मंदिरात या दिंडीचा दोन दिवस मुक्काम असतो. नंतर या देवळातून थेट पंढरपूरच्या दिशेने दिंडी प्रस्थान करते. १३ जूनला या दिंडीला सुरुवात झाली आहे. पनवेल तालुक्यातील भातान पाडा, कोळखे या गावांतून एकत्रितरीत्या कोकण दिंडी निघते. १४ जूनपासून या दिंडीचा पायी प्रवास सुरू झाला आहे. तळोजा मजकूर गावातून मोठ्या प्रमाणात वारकरी मंडळी टाळ-मृदंग घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. ही दिंडी थेट आळंदीला जाते. याठिकाणी ज्ञानेश्वर माउलींच्या रथासोबत सहभागी होऊन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. वाजे गावातून निघणाऱ्या दिंडीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. या गावातूनही आबालवृद्ध या दिंडीमध्ये सहभागी होऊन पायी चालत जातात. सुरुवातीला ही दिंडी आळंदीला जाते. त्यानंतर पंढरपूरला जाते. नवी मुंबई विमानतळाच्या शेजारी वसलेल्या कुंडेवहाळ या गावातून जाणाऱ्या दिंडीला अनेक वर्षांची परंपरा आहे. या गावातून जाणारे अनेक विठ्ठलभक्त या दिंडीमध्ये सहभागी होतात. या सर्व दिंड्या पंढरपूरपर्यंत २३ दिवस चालत जाणार आहेत. काही गावांजवळ आल्यानंतर या दिंड्या विश्रामाकरिता थांबून नंतर पुन्हा पंढरपूरच्या दिशेने जाण्यास सुरुवात करतात.
--------------------
कोकण दिंड्या म्हणून लौकिक
पनवेल, उरण या भागातून जाणाऱ्या सर्व कोकण दिंड्या म्हणून गणल्या जातात. काही दिंड्या आळंदीपर्यंत वाहनाने जातात. त्यानंतर पुढे माउलींच्या रथासोबत सहभागी होऊन पंढरपूरच्या दिशेने चालत जातात. ग्रामीण भागासोबतच कामोठे, कळंबोली, खारघर आणि खांदा कॉलनीसहित नवी मुंबई अशी कोकण दिंडी पंढरपूरच्या दिशेने जाते. या दिंडीमध्ये सुरुवातीला ६५० वारकरी चालतात. पंढरपूरपर्यंत तोच आकडा १,२०० पर्यंत होतो. इंचगिरी सांप्रदाय, किसन महाराज वारकरी सेवा मंडळातर्फे या दिंडीचे आयोजन केले जाते. २८ जूनला या दिंडीचे प्रस्थान होणार आहे. पंढरपूरला जाईपर्यंत या दिंडीचे आठ मुक्काम होऊन पंढरपूरला पोहोचतात.
-----------------------
संत तुकाराम महाराज आणि पनवेलचे नाते
पेशवे काळापासून वसलेल्या पनवेल शहरात पूर्वापार चालत आलेल्या वडाच्या झाडाखालील बाजारपेठेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे १६३२ मध्ये आल्याचे अनेक वारकरी सांगतात. वडाच्या झाडाखाली भरणाऱ्या बाजारात ते मिरचीचा व्यवसाय करीत असत. मिरचीचा व्यवसाय करीत असताना तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाची भक्ती सोडली नाही. नंतर त्यांचा हा व्यवसाय मागे पडला. त्यांच्या स्मरणार्थ जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्मारक समितीतर्फे वडाच्या झाडाखाली संत तुकाराम महाराज यांचे मिरची विक्री करतानाचे एक स्मारक तयार करण्यात आले आहे. पनवेलनंतर खालापूर तालुक्यातील साजगाव येथे एका डोंगरावर तुकाराम महाराज येऊन गेले आहेत. आता त्याठिकाणी विठ्ठलाचे भव्य मंदिर असून दरवर्षी या मंदिराजवळ मोठा उत्सव भरतो.
--------------------
पनवेल तालुक्यात वारकरी संप्रदायाचा मोठा वर्ग आहे. न चुकता दरवर्षी सगळे पंढरपूरची वारी करतात. पनवेल तालुक्याच्या विविध गावांतून आणि शहरी भागातून मोठ्या प्रमाणात दिंड्या पायी प्रवास करीत पंढरपूरला पोहोचतात. ऊन, वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता वारकरी चालत जातात.
- हभप पुंडलिक महाराज फडके, अध्यक्ष, रायगड वारकरी मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.