ठाकरेंची खरच टाळी की निव्वळ फार्स?

ठाकरेंची खरच टाळी की निव्वळ फार्स?

Published on

ठाकरेंची खरंच टाळी की निव्वळ चर्चा?
केवळ विधाने, प्रत्यक्ष युतीबाबत ठोस हालचालींचा अभाव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्‍ट्र नवनिर्माण सेेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येतील, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत. मुंबईतील दोघांच्या एकत्र येण्याचे आवाहन करणारे असंख्य फलक झळकले; मात्र दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या युतीबाबतच्या प्रतिक्रिया पाहिल्यास ठाकरे एकमेकांना खरेच टाळी देतील की हा निव्वळ चर्चा ठरेल, याबाबतची संदिग्धता अजूनही कायम आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची एक मुलाखत या चर्चेसाठी कारणीभूत ठरली होती. या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत राज ठाकरे यांना सकारात्‍मक प्रतिसाद दिला होता. ठाकरे बंधूंच्या वक्‍तव्यानंतर मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या दोन्ही पक्षांतील नेत्यांनी युतीच्या बाजूने सकारात्मक विधाने केली. ठाकरे गटाचे संजय राऊत, मनसेचे बाळा नांदगावकर, किशोरी पेडणेकर, संदीप देशपांडे यांच्याकडून वेगवेगळी विधाने सुरू असली तरी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच घेणार, हेदेखील स्पष्ट करण्यात आले. संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्याकडून एकत्र येण्याबाबत उलटसुलट विधानेही ऐकायला आली आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे; मात्र संभाव्य युतीबाबतची वक्तव्ये ही केवळ प्रसारमाध्यमे आणि भाषणापुरती सध्यातरी मर्यादित आहेत. दोन पक्ष एकत्र येण्यासाठी अधिकृत हालचाली अद्याप झालेल्‍या नाहीत.

युतीबद्दल मतैक्य नाही
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे बहुतांश राजकीय विश्लेषकांना वाटते; मात्र मनसेसोबत जाण्यासाठी आघाडीत बिघाडी करण्याची इच्छा शिवसेना नेत्यांमध्ये नाही. लोकसभेत आघाडीमुळे तिन्ही पक्षांना अभूतपूर्व यश मिळाले होते. शिवसेनेला कधी न मिळणारी मुस्लिम मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभेत हिंदुत्ववादी मतदान फिरल्यामुळे आघाडीच्या घटक पक्षांना अपयश आले. तरी यानिमित्ताने उभी राहिलेली नवीन मतपेढी उद्धव ठाकरे यांना गमवायची नाही, असाही एक सूर आहे. दुसरे म्हणजे एकाच कुटुंबातील असूनही युतीच्या दिशेने एकही ठोस कृती दोन्ही पक्षांकडून झालेली नसल्याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ही चर्चा सध्यातरी माध्यमांपुरती मर्यादित आहे, असे म्हणावे लागेल.

नेतृत्‍वाबाबतचा पेच
- उद्धव ठाकरेंची दलीत - मुस्लिम जवळीक
- राज ठाकरेंचा मुडी स्वभाव
- राज ठाकरेंची भाजप-एकनाथ शिंदेसोबतची जवळीक
- महाविकास आघाडीला राज ठाकरेंना विरोध
- ठाकरे कुटुंबातील कौटुंबिक कलह
- अमित ठाकरे यांच्या पराभवाचे शल्य

ठाकरे हे नावच संपवायचे आहे, अशा स्थितीत दोन्ही ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद दिला असेल तर महाराष्ट्र त्याचे स्वागत करतोय. आम्ही नक्कीच सकारात्मक दृष्टीने याकडे पाहत आहोत.
- खासदार संजय राऊत,
नेते, शिवसेना ठाकरे गट

आता गरज आहे म्हणून ते आमच्या मागे लागले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यावरून आमच्यावर टीका केली होती. तेव्हा त्‍यांना मराठी माणूस दिसला नाही का?
- संदीप देशपांडे, मनसे नेते

राजकीय गरजेपोटी दोन्ही भाऊ एकत्र येतील, अशी चिन्हे दिसत आहेत. राज ठाकरे यांनी अनेक पक्षांसोबत जुळवून पाहिले; पण त्यांना काही यश आले नाही. फोडीफोडीच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. दोघांना एकत्र येण्यासाठी मराठीचा मुद्दाच महत्त्वाचा आहे. त्‍यामुळे मराठीबाबतचे सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यतादेखील आहे. शेवटी या युतीचे भवितव्य सत्ताधारी पक्षाच्या डावपेचांवरदेखील अवलंबून आहे.
- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक

दोन्ही ठाकरेंसाठी सध्या आव्हानात्मक परिस्थिती आहे. मराठी माणूस व हिंदुत्वाकडे राज ठाकरेंचा ओढा आहे. त्‍यामुळे त्यांचा कल भाजपकडे अधिक होता. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत पक्ष सावरला. काँग्रेससोबत जाऊन बौद्ध व मुस्लिमांना सोबत घेऊन नवीन समीकरणे जुळवली. हे सोडून एकत्र येणे कठीण आहे.
- डॉ. सुमीत म्हसकर, राजकीयतज्‍ज्ञ

दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी उत्‍सुक आहेत; मात्र पुढाकार कोण घेणार, हा प्रश्न अजूनही कायम आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष मोठा असल्यामुळे मी पहिली टाळी का द्यावी, असे वाटते. तर आमच्याशिवाय तुमचे राजकारण चालू शकत नाही, असे राज ठाकरे यांना सांगायचे आहे; मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकत्र येण्याची भावना आहे.
- हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com