अलिबागमध्ये प्रभा करंडक एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

अलिबागमध्ये प्रभा करंडक एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

Published on

अलिबागमध्ये प्रभा करंडक एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) ः पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळअंतर्गत ग्रामीण रंगभूमीच्या वतीने माजी आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभा करंडक एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १३ जुलै रोजी होणार आहे.
ही स्पर्धा अलिबाग, मुरूड, रोहा, पेण आणि उरण या तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांपुरती मर्यादित आहे. ही स्पर्धा दोन गटांत होणार आहे. लहान गट सहा ते १४ वर्षे तर मोठा गट १५ वर्षांपासून पुढे असणार आहे. प्रवेश फी लहान गटासाठी २५ रुपये व मोठ्या गटासाठी ५० रुपये आहे. लहान गटात प्रथम क्रमांकासाठी पाच हजार, द्वितीय तीन हजार व तृतीय क्रमांकाला दोन हजार रुपये व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहे. तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक सात हजार, द्वितीय पाच हजार व तृतीय तीन हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धा नोंदणीवेळी कलाकारांनी त्यांचे आधार कार्डची एक प्रत जमा करणे बंधनकारक आहे. एकपात्री सादरीकरण हे मराठी भाषेतच असावे. सादरीकरणासाठी लहान गटासाठी कमीत कमी चार मिनिटे व जास्तीत जास्त पाच मिनिटे वेळ असणार आहे. तर मोठ्या गटासाठी कमीत कमी सहा ते सात मिनिटे असणार आहेत. सादरीकरण करताना अश्लील अथवा सामाजिक तेढ निर्माण करणारे नसावे, याची स्पर्धकांनी खबरदारी घ्यायची आहे. वेशभूषा, पार्श्वसंगीत आवश्यक वाटल्यास त्याची व्यवस्था स्पर्धकांनी त्यांच्या जबाबदारीवर करावयाची आहे. अधिक माहितीसाठी राजन पांचाळ (९२७१४३९६२४), प्रतीक पानकर (९६६५४९३९७३), देवेंद्र केळुस्कर (७७५८९०५८७७) किंवा जितेंद्र पाटील (७२७६१९९४३४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
................
पोलिस अधिकारी, अंमलदारांच्या शाळांना भेटी
विद्यार्थीसह शिक्षकांबरोबर साधला संवाद
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) ः पोलिस अधिकारी व अंमलदारांनी नुकतीच जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधला. अडचणीच्या काळात तत्काळ संपर्क करण्याकरिता डायल ११२ची माहिती देऊन विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टचबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या बालक विशेषतः मुलींवरील अत्याचार, विनयभंग, त्याचप्रमाणे इतर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. या अनुषंगाने पोलिसांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. डायल ११२ ही महाराष्ट्रातील आपत्कालीन सेवा आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, जसे की अपघात, चोरी, मारामारी किंवा इतर कोणतीही आरोग्यविषयक किंवा कायद्याची मदत लागल्यास, तुम्ही ११२ नंबर डायल करू शकता, असे या वेळी सांगण्यात आले. ही सेवा २४ तास उपलब्ध असून, डायल केल्यानंतर, तुमच्या मदतीसाठी पोलिस, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दल त्वरित पाठवले जाते. तसेच गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय, हे मुलांना समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. गुड टच म्हणजे असा स्पर्श जो मुलांना सुरक्षित, प्रेमळ आणि आरामदायक वाटतो, तर बॅड टच म्हणजे असा स्पर्श जो मुलांना भीतीदायक, अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटतो. त्‍यामुळे कोणत्याही प्रकारचा बॅड टच झाल्यास, लगेच पालकांना किंवा शिक्षकांना सांगावे, असे आवाहन या वेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले. त्याचप्रमाणे पालकांनीही मुलांना त्यांच्या शरीराची मर्यादा समजून घेण्यास मदत करावी. मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहित करावे, त्यांना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात वाढण्यास मदत करावी, असे मार्गदर्शन पोलिसांनी केले.
...........
रोहा तालुक्‍यात कुणबी दाखल्यांची समस्या
गावनिहाय डेटा तयार करणार; कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय
रोहा, ता. २२ (बातमीदार) ः कुणबी समाज जातीच्या दाखल्यांसाठी जिल्ह्यात गावनिहाय डेटा तयार करण्यात येणार आहे. नुकतेच कुणबी समाज कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कुणबी समाज कार्यकारिणीची सभा कुणबी भवन येथे तालुकाध्यक्ष रामचंद्र सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्य उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी रायगड जिल्‍ह्यातील रोहा, सुधागड, पेण, अलिबाग, खालापूर, पनवेल, कर्जत येथील कुणबी दाखल्याची मोठी समस्या मांडण्यात आली. कुणबी दाखला नसल्याने समाजातील मुलांना शैक्षणिक समस्यांसह अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी शासनदरबारी अनेकदा निवेदन दिली. अनेक आंदोलने केली; मात्र त्यावर आजतागायत कोणतीही कार्यवाही न झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. आम्ही जन्माने आणि कर्माने कुणबी आहोत; मात्र १९६७चा पुरावा नसल्याने दाखल्यास अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा या वेळी मांडण्यात आला. यावर शासनाकडून उपाययोजना करण्यासाठी संघामार्फत तसेच रायगड रोहा तालुका कुणबी समाजाच्या वतीने सद्यःस्थितीत माहिती संकलित करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. जातीच्या दाखल्याचा महत्त्वाचा विषय हाती घेतला असून त्यासाठी संपूर्ण गावनिहाय डेटा येत्या काळात तयार करून शासनदरबारी पाठवण्यात येणार असल्याचे या वेळी बैठकीत सांगण्यात आले. यासाठी पुन्हा एकदा रोहा तालुका कुणबी सर्वेक्षण २०२५ला धडाक्यात सुरुवात होत आहे. या सर्वेक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम आयोजित सभेत जाहीर करण्यात आला. या वेळी रोहा तालुक्यातील सर्व कुणबी समाजबांधवांना आपली वस्तुनिष्ठ माहिती आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना म्हणजेच सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या कुणबीबांधवाला द्यावी, असे आवाहन रोहा तालुका कुणबी समाजोन्नती संघाकडून करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com