बंदी उठताच मूर्ती कार्यशाळांमध्ये लगबग
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यावरील बंदी उठवल्याने मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे. यंदा गणरायाचे आगमन २७ ऑगस्ट रोजी होणार असून, गणेशमूर्तींचे माहेरघर असणाऱ्या पेण तालुक्यासह अन्य ठिकाणीही गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. भाविकांकडून मागणी वाढली आहे, त्यातुलनेत मूर्ती घडविण्यासाठी वेळ कमी पडत असल्याने मूर्तिकार तसेच कारागीर दिवस-रात्र काम करीत आहेत. सध्या पावसामुळे मूर्ती सुकविण्यास अडथळे येत असल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे.
गणरायाचे आगमन दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. मूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकारांना अगदी कमी कालावधी मिळाला आहे. पेणमधील गणेशमूर्ती आकर्षक, रेखीव व सुंदर म्हणून परिचित आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करण्याचे माहेरघर म्हणून पेणची एक वेगळी ओळख आहे. पेणमध्ये दोन हजारांहून अधिक मूर्तीचे कारखाने आहेत, परंतु यंदा पीओपीच्या मूर्ती तयार करण्याबाबत मूर्तिकारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ग्राहकांकडूनही पाहिजे तशी मागणी नोंदवण्यात येत नव्हती. जर पीओपीवर बंदी आली, तर आगाऊ बनवलेल्या मूर्तींवरील खर्च वाया जाणार आणि उपासमारीची वेळ येणार, अशी चिंता मूर्ती कारखानदारांना सतावत होती, मात्र उच्च न्यायालयाचा निकाल ऐकताच पीओपीसह शाडूच्या मूर्तींची भाविकांकडून आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील पेणसह अलिबाग, महाड, पनवेल, मुरूड, खोपोली या ठिकाणीदेखील गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. दोन-अडीच फुटांपर्यंत मूर्तींना अधिक मागणी असल्याचे सांगण्यात आले आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्राहकांपर्यंत वेळेवर मूर्ती पोहोचवण्यासाठी मूर्तिकारांसह कारागिरांनी कंबर कसली आहे. तसेच जादा मोबदला देऊन कारागिरांकडून काम करून घेतले जात आहे. सध्या १० हजारांहून अधिक कामगार कार्यरत असून, हजारो हातांना काम मिळाले आहे.
पहिल्या टप्प्यात सात हजार मूर्ती परदेशात रवाना
पेणमध्ये सुमारे १६०० गणेशमूर्ती तयार करणारे कारखाने आहेत. येथील गणेशमूर्तींना महाराष्ट्रासोबतच इतर राज्यात आणि परदेशातील भाविकांकडून मागणी आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, थायलंड, न्यूझीलंड, जपान यांसारख्या देशांमध्ये या मूर्ती पाठवल्या जातात. एप्रिलपासून गणेशमूर्तींची निर्यात सुरू होते. यावर्षी पेणमधून आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, कॅनडा आदी देशात पहिल्या टप्पात सात हजार गणेशमूर्तींची रवानगी करण्यात आली आहे. आता मागणीनुसार गणेशमूर्तींची निर्यात करण्यात येणार आहे.
किमतीत २५ ते ३० टक्के वाढ
अनेक दिवसांपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. मागणी प्रचंड वाढली आहे. यावर्षी मूर्तींच्या किमतीतही २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आधी ढगाळ वातावरण, त्यानंतर आता पावसामुळे मूर्ती सुकवण्यात अडचणी येत आहेत. पीओपीवरील बंदी उठल्याने अनेक मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे, मात्र वेळ कमी असल्याने दिवस-रात्र काम सुरू असल्याचे हमरापूर येथील गणेशमूर्तिकार रामनाथ ठाकूर यांनी सांगितले.
पेण-हमरापूरमध्ये गणेशमूर्तिकारांचा जल्लोष
पेण (वार्ताहर) : उच्च न्यायालयाने पीओपीवरील गणेशमूर्तींवर बंदी घातल्याने अनेक कारखानदार अडचणीत आले होते. महाराष्ट्रातील सर्व मूर्तिकारांनी एकत्र येत लढा उभा केल्याने नुकतेच उच्च न्यायालयाने पीओपीच्या गणेशमूर्तींवरील बंदी उठवली, त्यानंतर पेणच्या गणेशमूर्तिकारांनी जल्लोष साजरा करून हमरापूर विभागात मिरवणूकही काढली होती. गणेशमूर्तींच्या उंचीबाबत तसेच विसर्जनाबाबत राज्य सरकारने निर्णय द्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
वैकुंठ पाटील यांनी मानले सांस्कृतिक मंत्र्यांचे आभार
वडखळ (बातमीदार)ः पीओपीवरील बंदी उठवल्याने महाराष्ट्रातील हजारो कारखानदारांना व कामगारांना दिलासा मिळाला असून, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे दक्षिण भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी नुकतेच सांस्कृतिक मंत्री व रायगडचे संपर्कप्रमुख आशीष शेलार यांचे गणपती बाप्पांची सुबक मूर्ती व शाल देऊन आभार मानले. या वेळी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील उपस्थित होते. महाराष्ट्रासह देशात तसेच जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती पर्यावरणाला हानिकारक असल्याचे त्यावर बंदी घालण्यात आली होती, मात्र नुकतीच उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. या न्यायालयीन लढाईत सांस्कृतिक मंत्री तथा रायगड संपर्कप्रमुख आशीष शेलार हे गणपती कारखानदारांच्या पाठीशी कायम उभे होते. त्यामुळे भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी शेलार यांची भेट घेत पेणच्या गणपती कारखानदारांच्या वतीने आभार मानले.
वडखळ ः सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांचे वैकुंठ पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.