थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

अलिबाग लायन्स क्लबचा शपथविधी सोहळा उत्साहात
अलिबाग (वार्ताहर) ः लायन्स क्लब ऑफ अलिबागचा इंडक्शन आणि इन्स्टॉलेशन समारंभ क्षात्रैक्य समाज सभागृहात उत्साहात पार पडला. लायन्स क्लब इंटरनॅशनलचे पदाधिकारी सीए के. एल. परमार, फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल जाधव यांच्या उपस्थितीत नवनियुक्त लायन्स पदाधिकाऱ्यांलर आपल्या कार्यकर्तृत्वाची शपथ देण्यात आली.
या वेळी अलिबाग डायमंड अध्यक्ष श्रुती सरनाईक, लिओ लायन अध्यक्ष ओमकार मालपाणी यांच्यासह क्लबमधील इतर पदांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा झाला. अलिबाग लायन अध्यक्षपदी प्रदीप नाईक, सेक्रेटरीपदी महेश कवळे, तर ट्रेझरर अमोघ किंजवडेकर, फर्स्ट व्हीपी महेश चव्हाण यांना आपल्या पदाची शपथ देण्यात आली. १० नवीन लायन मेंबर्सचेही इन्स्टॉलेशन करण्यात आले. आपल्या नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी २०२५-२६ या लायन वर्षात सर्वांच्या साथीने निष्ठेने काम करण्याचे अभिवचन दिले. व्यासपीठावरून बोलताना लायन परमार यांनी अलिबाग लायन्स क्लबच्या आजवरील कामाचे विशेषतः अलिबाग फेस्टिव्हल, टॅलेंट हंट, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी या उपक्रमांचे कौतुक केले. या सोहळ्यातील रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, विजय वनगे, झोन चेअरपर्सन विकास पाटील, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर अनिल म्हात्रे, नयन कवळे, प्रियदर्शनी पाटील, मावळत्या अध्यक्ष गौरी म्हात्रे, अंकिता पाटील यांच्यासह दोनशेहून अधिक लायन्स उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन जान्हवी आगाशे आणि अपर्णा पाटील यांनी केले.
.......................
गोरेगाव पोलिसांनी दिले स्वसंरक्षणाचे धडे
श्रीवर्धन (बातमीदार) : म्हसळा तालुक्यातील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या संदेरी येथील माध्यमिक विद्यालयात गोरेगाव पोलिस ठाणे यांच्या दामिनी पथक व ‘पोलिस काका – पोलिस दीदी’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. पाचवी ते दहावीच्या वर्गातील ३५ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना कराटेच्या प्राथमिक तंत्रांची शिकवण देण्यात आली. आत्मरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करत कराटे प्रशिक्षक आतेश साळवी, प्रथमेश मालगुंडकर, वरुण टेंबे व शीतल पवार यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महिलांविषयक गुन्ह्यांविरोधातील कायदे, सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय, तसेच अत्यावश्यक प्रसंगी ‘डायल ११२’ या आपत्कालीन सेवा क्रमांकाची माहिती देण्यात आली. सोशल मीडियावर वाढत असलेल्या फसवणुकीपासून संरक्षण, खासगी माहितीची गोपनीयता आणि सायबर सुरक्षिततेचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महिला पोलिस रेखा सचिन मोहिते, तसेच पोलिस कर्मचारी तेजस बेलनेकर व किशोर कुवेसकर यांनी ‘दामिनी पथक’ या विशेष उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधत, पोलिसांशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, आधुनिक युगातील धोके ओळखून त्याला योग्य प्रकारे तोंड देण्याची मानसिकता विकसित होण्यास मदत झाली आहे.
..........
पेझारीत अमली पदार्थ विरोधी दिन जनजागृती प्रभातफेरी
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे नुकतीच २६ जून या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. यानिमित पोयनाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दराडे व पोलिस अंमलदार यांनी पेझारी येथील कोएसो नाना पाटील हायस्कूलला भेट दिली. या भेटीमध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांच्याबरोबर अमली पदार्थ विरोधी दिनानिमित कार्यशाळा व परिसंवाद करून चर्चा करण्यात आली. या वेळी अमली पदार्थ विरोधी दिन आणि त्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच पोलिसांनी कोएसो नाना पाटील संकुल, पेझारी नाका ते पेझारी चेकपोस्ट अशी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढली. या प्रभातफेरीला पोयनाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दराडे, पोलिस ठाण्याचे अंमलदार व पोलिस कर्मचारी, कोएसो नाना पाटील संकुलातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...........
सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रेचे भक्तिमय वातावरणात स्वागत
रोहा, ता. २४ (बातमीदार) ः हजारो वर्षे पुरातन असलेले सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष रोह्यात श्री श्री रविशंकर यांच्या आशीर्वादाने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून शनिवारी (ता. २१) दर्शनासाठी दाखल झाले होते. या दर्शन यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण रोहा नगरी हर हर महादेवाच्या गजरात दुमदुमून निघालेली पाहायला मिळाली. सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रेचे रोहावासीयांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावत भक्तिमय वातावरणात स्वागत केले. या वेळी श्री श्री रविशंकर यांचे शिष्य स्वामी दर्शन हाती व त्यांचे सहकारी यांचे सुमधुर वाणितील मंत्रोच्चारात झालेल्या रुद्र पूजेत शेकडो शिव भक्तांनी आपले संकल्प सिद्धीस जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा दक्षिणेतील बंगळूरवरून मार्गस्थ होत २१ जून रोजी रोहा शहरात दाखल झाली. रोहा शहराची साहित्य पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या भाटे सार्वजनिक वाचनालय येथे यात्रेचे भक्तिमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्वामी दर्शक हाती यांनी यात्रेचा उद्देश पवित्र पुरातन शिवलिंगाचा इतिहास आपल्या ओघवत्या वाणीने कथन केला. त्यानंतर रुद्र पूजा झाल्यानंतर ओम नमो शिवाय, हर हर महादेवच्या गजरात उपस्थित भाविकांनी पवित्र पुरातन शिव लिंगाचे दर्शन घेतले.
.........
पेण देवनगरी येथे नियोजित उद्यानाचे भूमिपूजन
पेण (वार्ताहर) : पेण नगर परिषद हद्दीतील देवनगरी येथील सर्व्हे नंबर १०९ मध्ये नव्याने नियोजितरित्या तयार होणाऱ्या उद्यानाचा भूमिपूजन सोहळा रविवार २२ जून रोजी देवनगरी सोसायटीचे अध्यक्ष मधुकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या नियोजन विभागाकडून २० लाखांचा निधी याकरिता उपलब्ध करण्यात आला आहे. या वेळी देवनगरी सोसायटीचे अध्यक्ष मधुकर पाटील, पेण शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस मीनाक्षी पाटील, जे. एस. पाटील, ध्वजा गुरखा, राजा देशमुख, मुकुंद टेमघरे, माणिक पवार, कैलास पाटील, काशिनाथ महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com