आपली चिकित्सा अखेरच्या टप्प्यात
आपली चिकित्सा अखेरच्या टप्प्यात
ऑगस्टमध्ये सुरू होण्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४: महापालिकेच्या ‘आपली चिकित्सा’ या सवलतीच्या आरोग्य योजनेची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आहे. या सेवेला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. ही योजना लागू झाल्यास मुंबईकरांना त्यांच्या घराजवळ रक्तचाचण्या करणे सोपे होईल.
पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यापर्यंत ही चाचणी सुविधा सुरू होऊ शकेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची स्वाक्षरी झाली आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच ही फाइल स्थायी समितीला दिली. मात्र, स्थायी समिती नसल्याने आयुक्त भूषण गगराणी हेच प्रशासक म्हणून ‘आपली चिकित्सा’ योजनेसाठी मंजुरी देतील. त्यांची अंतिम स्वाक्षरी झाल्यानंतर निवड झालेल्या सेवा पुरवठादाराला अधिकृतपणे कळवले जाईल आणि नंतर महापालिका व ठेकेदार यांच्यात कंत्राटासाठीचे लागणारे दस्तऐवजीकरण पूर्ण होईल. त्यानंतर दरनिश्चितीचे परिपत्रक काढून सेवा सुरू होईल, मात्र प्रत्यक्षात सेवा सुरू होण्यासाठी ठेकेदाराला साधारणतः ३० दिवसांची मुदत मिळू शकते. त्यामुळे ही योजना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सद्यस्थितीत ताप, डेंगी, मलेरिया यांसारख्या आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना चाचण्यांसाठी उपनगरीय रुग्णालयांमध्ये धावपळ करावी लागत आहे, तर मुंबईकरांना महापालिका रुग्णालय किंवा खाजगीत या तपासण्या कराव्या लागत असल्याने वेळ व पैसा खर्च होत आहे. ही योजना सुरू झाल्यास ऑगस्ट महिन्यात मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मिळेल, असेही सांगण्यात आले.
डेडलाइन चुकल्या
आधी जानेवारी, मग मे महिना नंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला ही योजना सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र निविदा प्रक्रियेत ही योजना रखडली. निविदाकार मिळत नसल्याने निविदा प्रक्रिया पुढे सरकली नाही. या सुविधेमुळे मुंबईकरांना आपल्या घराजवळ वैद्यकीय सेवा मिळू लागल्या होत्या, पण गेल्या वर्षीच्या १५ डिसेंबरपासून ही योजना बंद झाली. दोनदा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. आता ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.
ऑगस्ट उजाडणार, पण दिलासा मिळणार?
नव्या निविडा प्रक्रियेत ठेकेदाराला चार वर्षांत ७०.८० लाख चाचण्या करण्याचे बंधन आहे. यासोबतच सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल संध्याकाळी ८ वाजेपर्यंत देणे बंधनकारक असेल.
४९८ केंद्रांवर तपासणी सेवा
नव्या टप्प्यात ‘आपली चिकित्सा’ ही सेवा ४९८ आरोग्य केंद्रांवर दिली जाणार आहे. यात ४४० एचबीटी दवाखाने, ३० मॅटर्निटी होम, १६ उपनगरीय रुग्णालये, पाच विशेष रुग्णालये, तीन अर्बन हेल्थ सेंटर, कूपर रुग्णालय आणि ट्रॉमा केअर यांचा समावेश आहे.
पूर्वी दररोज चार हजार तपासण्या
गरीब रुग्णांना कमी किमतीत चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, पालिकेने २०१९ मध्ये आपला दवाखाने, प्रसूतिगृहे आणि रुग्णालयांमध्ये आपली चिकित्सा योजना सुरू केली होती. याअंतर्गत दररोज चार हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी केली जायची. २७.५ कोटी रुपयांच्या करारात २० लाखांहून अधिक मूलभूत आणि तीन लाखांहून अधिक प्रगत तपासण्या करण्यात आल्या, मात्र दीड वर्षापूर्वी निर्धारित संख्येच्या चाचण्या पूर्ण झाल्यामुळे निविदाच संपली आणि ही योजना डिसेंबर २०२४ मध्ये थांबवण्यात आली.
यंदा चाचण्यांची संख्या कमी
मागील टप्प्यात १३९ प्रकारच्या चाचण्या होत होत्या, मात्र नव्या योजनेत सुमारे ९० चाचण्या ठेवण्यात आल्या आहेत. डेंगी, मलेरिया, मधुमेह, थायरॉईड, यकृत कार्य तपासणी, लघवी तपासणी, एचआयव्ही, विटॅमिन डी आणि बी १२ चाचण्या उपलब्ध असतील, मात्र पॅप स्मीअर, आयर्न प्रोफाइल, कारबामाझेपिन यांसारख्या आवश्यक तपासण्या यादीतून वगळण्यात आल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.