केएबीयू क्षेत्रात ''ग्रीन आर्मी''ची स्थापना!

केएबीयू क्षेत्रात ''ग्रीन आर्मी''ची स्थापना!

Published on

केएबीयू क्षेत्रात ‘ग्रीन आर्मी’ची स्थापना
उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) ः शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणात हरवलेली हरित छटा पुन्हा खुलवण्यासाठी उल्हासनगर, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर (केएबीयू) या चार प्रमुख शहरांतील सर्व रोटरी क्लब एकत्र आले असून, पर्यावरण संवर्धनासाठी ‘ग्रीन आर्मी’ तयार केली आहे.
हे अभियान नवनिर्वाचित रोटरी अध्यक्ष गोरधन गोलानी आणि समन्वयक गुल अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, सर्व क्लबचे पदाधिकारी, सदस्य, पर्यावरणप्रेमी, एनसीसी, स्काउट गट आणि स्थानिक नागरिकही यात सहभागी होणार आहेत. रोटरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्रिय पाठबळासह ही चळवळ शहराच्या पर्यावरणीय समृद्धीसाठी एक महत्त्वपूर्ण वाटचाल ठरणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत सुमारे तीन हजार झाडांचे रोपण करण्यात येणार असून, महाराष्ट्र वन विभागाच्या मदतीने हा उपक्रम राबवला जाणार आहे. या वृक्षारोपणासाठी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सार्वजनिक उद्याने आणि नदीकिनारे ही ठिकाणे निवडली जाणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक रोपणकर्ता आपले झाड स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या नावाने लावू शकतो. झाडे मोफत उपलब्ध करून दिली जातील. रोटरी क्लबद्वारे प्रत्येक रोपणकर्त्याकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे. यात त्याने लावलेल्या झाडाची देखभाल व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. ही बाब अभियानाच्या दीर्घकालीन यशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना रोटरीचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. राजू उत्तमानी, गुल अडवाणी, गोरधन गोलानी, हरीश कृपलानी आणि मनू बुधरानी यांनी हे फक्त एक रोपण अभियान नाही, तर आगामी पिढ्यांकडे हिरवा वारसा सोपवण्याचा संकल्प आहे. प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होऊन ‘माझं झाड, माझी जबाबदारी’ ही भावना अंगीकारावी, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com