नासधूस करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार

नासधूस करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार
Published on

सेवावाहिन्या टाकताना नासधूस करणाऱ्यांवर कारवाई
शहर अभियंता अनिता परदेशी यांचा ठेकेदारांना इशारा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत विविध शासकीय, निमशासकीय संस्थांच्या माध्यमातून भूमिगत सेवावाहिन्या टाकण्याची कामे केली जात आहेत. ही कामे करताना पालिका अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काही संस्था, त्यांचे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करून पालिका हद्दीतील जलवाहिन्या, पथदिवे वीजवाहिन्या, काँक्रीट रस्त्यांची तोडफोड करीत आहेत. अशाप्रकारे सेवावाहिन्या टाकताना नासधूस करणाऱ्या संस्था, ठेकेदारांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिला आहे.

काही दिवसांपासून विविध प्रकारच्या संस्थांकडून सेवावाहिन्या टाकण्याची कामे करताना पालिकेच्या जलवाहिन्या, सिमेंट काँक्रीट रस्त्यांची तोडफोड करून प्रशासनासह नागरिकांना अडथळा, त्रास होईल, अशा पद्धतीने कामे केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील वर्षीदेखील बेशिस्त ठेकेदार, संबंधित नियंत्रक संस्थांवर पालिकेने फौजदारी गुन्हे दाखल केले होते, असे शहर अभियंता परदेशी यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत दूरसंचार, गृहविभाग, महावितरण, महानगर गॅस अशा विविध ग्राहक सेवा देणाऱ्या संस्थांना सेवावाहिन्या टाकण्यासाठी पालिकेने शुल्क भरणा करून परवानग्या दिल्या आहेत. ही कामे सेवादायी संस्थांनी पालिका अधिकारी, अभियंते यांच्याशी समन्वयाने करायची आहेत. तशा अटी-शर्ती या संस्थांना टाकल्या आहेत. तरीही काही संस्था सेवावाहिन्या टाकताना मनमानी पद्धतीने रात्रीच्या वेळेत पालिका प्रशासनाला पूर्व माहिती न देता जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने खोदकाम करतात. यामुळे पालिकेच्या भूमिगत जलवाहिन्या, जल, मलवाहिन्यांना गळती लागते.

प्रवासी वाहतुकीला अडथळा
जलवाहिनी फुटल्यानंतर पाणीटंचाईचा फटका शहराला बसतो. जल, मलवाहिनी फुटल्यानंतर परिसराला त्याचा त्रास होतो. नवा कोरा काँक्रीट रस्ता सेवावाहिन्या टाकण्यासाठी फोडल्यानंतर प्रवासी वाहतुकीला अडथळा येतो. त्यामुळे पालिका हद्दीत बेशिस्तीने सेवावाहिन्या टाकण्याची कामे करणाऱ्या विविध प्रकारच्या एजन्सी, नियंत्रक संस्था यांना प्रथम सुस्थितीत कामे करण्याची सूचना करण्यात येईल. त्यानंतर बेशिस्तीने कामे केली जाणार असतील तर अशा ठेकेदार, नियंत्रक संस्था, एजन्सींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्रशासन विचार करीत आहे, असे शहर अभियंता परदेशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com