फॉरेक्स ट्रेडिंगडा बळी पडून गमावले ४० लाख

फॉरेक्स ट्रेडिंगडा बळी पडून गमावले ४० लाख

Published on

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका टोळीने घणसोलीत राहणाऱ्या दोघांकडून तब्बल ४० लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केली. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या टोळीविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. या टोळीने अशाच पद्धतीने अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टोळीमध्ये जाई मनोहर कमद, सुरज कदम, सचिन डोंगरे व विकास निकम या चौघांचा समावेश आहे. यातील सचिन डोंगरे व विकास निकम या दोघांनी २०२३ मध्ये महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये एसव्हीपीएस ग्रुप या नावाने कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर या दोघांनी दुबई स्थित जेकेव्ही ग्लोबल या कंपनीद्वारे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवत असल्याचे तसेच गुंतवणुकीवर झालेल्या नफ्यातील ३० टक्के नफा कमिशन घेऊन उर्वरित ७० टक्के नफा गुंतवणूकदारांना दिले जात असल्याचे प्रलोभन दाखविण्यास सुरुवात केली. या टोळीच्या प्रलोभनाला भुलून घणसोली येथे राहणाऱ्या मनीषा किर्वे या महिलेने त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी बचत करून ठेवलेले २० लाख रुपये या कंपनीत गुंतवले. तसेच त्यांच्या ओळखीतल्या हर्षद गोसावी यानेदेखील २० लाख गुंतवले.
--------------------
पैसे मागताच कार्यालय बंद करून पलायन
सुरुवातीला डोंगरे आणि निकम यांनी त्यांच्या ट्रेडिंगच्या खात्यामध्ये चांगली वाढ होत असल्याचे भासवून त्यांना चांगले पैसे मिळणार असल्याचे सांगितले; मात्र किर्वे आणि गोसावी यांनी त्यांच्या खात्याचा तपशील देण्यास सांगितले असता, त्यांनी टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर डोंगरे आणि निकम या दोघांनी त्यांचे मोबाईल बंद केले, तसेच कार्यालय बंद करून पलायन केले. त्यानंतर टोळीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर मनीषा किर्वे यांनी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या टोळीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com