कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देण्याची मागणी
कल्याण ( वार्ताहर) : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीने केली आहे. याबाबत राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर यांनी आयुक्त आणि वैद्यकीय आयुक्तांना पत्र दिले आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेत २०१५ पासून २७० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. या अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना दरमहा एक तारखेला नियमित वेतन अदा करणे अपेक्षित आहे, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर अदा केले जात नाही. वेळोवेळी विचारणा केल्यानंतर ‘फंड आलेला नाही’ अथवा ‘सही प्रक्रियेत आहे’ आदी कारणे सांगण्यात येतात. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या मानसिक व आर्थिक स्थैर्यावर गंभीर परिणाम होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या रोजच्या गरजा जसे की घरभाडे, किराणा, वीजबिल, शालेय खर्च व प्रवास खर्च यांचा भार त्यांच्यावर येत आहे. विशेष म्हणजे, याच अभियानांतर्गत इतर टेंडर व बिलांची अंमलबजावणी वेळेवर होत असतानाही कर्मचाऱ्यांच्या वेतनास दुय्यम वागणूक मिळत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त व संचालक यांच्या आदेशांचेही उल्लंघन होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि संबंधित विभागास कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राहुल काटकर यांनी केली आहे.
........................
पंचायत समितीच्या वतीने बियाणे वाटप
टिटवाळा (वार्ताहर) : शेतकऱ्यांच्या हितासाठी कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सेस योजनेअंतर्गत तब्बल ९० टक्के अनुदानावर तूर बियाण्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. या वेळी कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे यांची उपस्थिती होती. या योजनेतून सुमारे १०० किलो तूर बियाणे शेतकऱ्यांना वितरित केले असून, केवळ ७/१२ उताऱ्याच्या आधारे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वीच भात बियाणे ५० टक्के अनुदानावर वाटप केले होते. आता तूर बियाणे मोठ्या प्रमाणात आणि अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले आहे. दहागाव पोई येथील शेतकरी गुरुनाथ सांबरे यांच्याकडे बियाणे सुपूर्द करून उपक्रमाची सुरुवात केली. त्याचबरोबरच कमलाकर राऊत, दिलीप म्हाडसे, पंढरीनाथ भोईर आदी शेतकऱ्यांनाही बियाणे वितरित करण्यात आले. कार्यक्रमास कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे, कनिष्ठ सहाय्यक आर. बी. दळवी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. तूर हे प्रथिनयुक्त आणि शाश्वत उत्पन्न देणारे महत्त्वाचे पीक असल्याने या बियाणे वाटपामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पादनात भरघोस वाढ होण्याची आशा व्यक्त होत आहे.
......................
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे आयोजन
कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती उत्सव गुरुवारी (ता. २६) दुपारी तीन ते रात्री ११ वाजेपर्यंत आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केला आहे. सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांनी केले आहे. या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर, मोफत डोळे तपासणी, प्रबोधन सत्र, तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज दत्तक योजनेतील मुलांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्यवाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जयंती समितीचे अध्यक्ष संतोष हेरोडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com