लोणशी शाळेत प्रवेश उत्‍सव साजरा

लोणशी शाळेत प्रवेश उत्‍सव साजरा

Published on

लोणशी शाळेत प्रवेश उत्‍सव साजरा
माणगाव (वार्ताहर) ः राजिप शाळा लोणशी येथे प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. आरती ओवाळून पुष्पगुच्छ देऊन खाऊवाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल वर्गामध्ये उमटवून स्वागत करण्यात आले. शाळेच्या सहकारी शिक्षिका चेतना तेटगुरे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या उपस्थितीत हा स्‍वागत सोहळा पार पडला. त्यानंतर विद्यार्थ्यांना शासनामार्फत देण्यात येणारे मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व बूट यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून दामिनी पथकाची भेट व मार्गदर्शन शाळेत आयोजित करण्यात आले होते. तसेच २१ जून रोजी जागतिक योगदिन म्हणून सर्व पालक व ग्रामस्थ मंडळांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून योगदिन साजरा करण्यात आला. तसेच आई-वडिलांच्या नावाने विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात या वेळी झाडे लावली.
..............
लाइट ऑफ लाइफ ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्यवाटप
अलिबाग (वार्ताहर) ः लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट या सामाजिक संस्थेतर्गत २१ व २२ जूनदरम्यान अलिबाग विभागामध्ये बोर्ली, वळके, रामराज आणि बेलोशी या चार केंद्रांमध्ये शैक्षणिक साहित्यवाटप करण्यात आले. तळागाळातील गरीब-गरजू होतकरू मुले शाळेमध्ये गेली पाहिजेत, या मुख्य उद्देशाने लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट संस्थेने हे कार्यक्रम आयोजित केले होते. संस्था गेली १९ वर्षे अलिबागमध्ये कार्यरत आहे. यावर्षी संस्थेने बोर्ली, वळके, रामराज आणि बेलोशी अशा चार विभागांतून इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या ४५५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मिळून ९५० हून अधिक जण उपस्थित होते. साहित्यवाटप कार्यक्रमाला ग्रामपंचायत बोर्लीचे सरपंच सपना जायपाटील, राजिप शाळा चोरढे, मुख्याध्यापिका संगीता भगत, गोरक्षनाथ मोहिते तसेच इतर शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आर्या राऊत, अनुजा राउळ, रश्मी अष्टमकर, राणी जाधव, अपेक्षा शेळके आणि सोनल घरत तसेच इतर शिक्षकांचा उल्लेखनीय सहभाग होता.
.......................
तळाघर रोहा कबड्डी संघाचा चिखलात कसून सराव
रोहा (बातमीदार) ः रोहा तालुका हा रायगड जिल्ह्यात कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जातो. याच रोहा तालुक्यात अनेक नामवंत खेळाडू व बलाढ्य संघदेखील आहेत. यामध्ये युवकांचा भरणा असलेला तळाघर रोहा हा संघ यंदाही पावसाळी क्रीडा स्पर्धेत त्याच ताकदीने व त्याच युक्तीने मौसमी हंगामात चांगली कामगिरी करण्यासाठी उतरला आहे. त्‍यानुसार दररोज सर्व खेळाडू जवळपास दोन तास चिखलात कसून सराव करत आहेत. भरपावसात कशाची पर्वा न करता फक्त कबड्डीत यश हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून खेळाडू आपले कौशल्य दाखवून चिखलामध्ये मेहनत करताना दिसून येत आहेत. तळाघर रोहा कबड्डी संघ हा धाटव पंचक्रोशीसह तालुक्यात चांगल्या पद्धतीने खेळाचे प्रदर्शन करत आहेत. या संघामध्ये सर्वच खेळाडू १७ ते २२ वयोगटातील असून, दररोज उद्याच्या भविष्यासाठी एकीचे बळ दाखवत नियमित धावणे, व्यायाम, शिस्त व प्रेक्षणीय खेळ कसा होईल या अनुषंगाने सर्व खेळाडू अविरतपणे मेहनत घेत आहेत. गतवर्षी याच संघाने उत्तम कामगिरी केली. जिल्ह्यातील मुरूड, अलिबाग, पेण, रोहा येथे खेळाचे उत्तम प्रदर्शन पाहायला मिळाले होते. आगामी किशोर व कुमार गट निवड चाचणीत संघ पूर्ण ताकदीने उतरणार असून, सर्व स्पर्धेत संघ दमदार कामगिरी करेल, असा विश्वासदेखील सर्व खेळाडूंनी व्यक्त केला आहे.
.................
नेत्रतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण (वार्ताहर) : शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई व बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन जैन समाज हॉल येथे करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास १७० रुग्णांची तपासणी करून ३६ रुग्णांची मोतीबिंदू ऑपरेशनसाठी रवानगी करण्यात आली. पेण शहरातील प्रसिद्ध उद्योजक विशाल बाफना यांचे बाफना ज्वेलर्स अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत. त्‍या अनुषंगाने शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई आणि बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुदर्शन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये सायंकाळपर्यंत एकूण १७० रुग्णांची तपासणी करण्यात आली. या वेळी बाफना ज्वेलर्सच्या लीना बाफना, विशाल बाफना, नितीन पाटील, कृषभ जैन यासह डॉक्टर्स उपस्थित होते.
..................
आम्ही आगरी ग्रुपकडून १८ विद्यार्थ्यांचा गौरव
कर्जत, ता. २५ (बातमीदार) ः दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कर्जत तालुक्यातील आगरी समाजातील १८ विद्यार्थ्यांचा आम्ही आगरी ग्रुपतर्फे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. हा उपक्रम गेली अनेक वर्षे यशस्वीपणे राबवला जात आहे.
यंदा तालुक्यातील आगरी समाजातील प्रत्‍येकी १२ आणि सहा असे विद्यार्थी दहावी, बारावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्‍यामुळे आम्ही आगरी ग्रुपतर्फे त्यांच्या घरी जाऊन पालकांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मानपत्र, फुलांचा हार, भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये भडवळ, माळेवाडी, खांडस, पोशीर, चांधई, बीड, उमरोली, तळवडे, पाथरज, कर्जत शहर अशा अनेक गावांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. कार्यक्रमात केशव मुने, संदीप म्हसकर, मनीषा दळवी, किशोर घारे, अंकुश शेळके, मिलिंद विरले, मनोहर हजारे, अ‍ॅड. श्रीकृष्ण डुकरे, शिवाजी कराळे, संतोष पेरणे, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. मुख्याध्यापक गंगावणे, चित्रकार रामदास लोभी, माजी उपसरपंच आदेश धुळे, सायकलपटू गजानन डुकरे आदी मान्यवरांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
........
डॉ. क्रिशा कमलेश जैन पेन यांचा भव्य सत्कार
पेण, ता. २५ (बातमीदार) डॉ. क्रिशा कमलेश जैन यानी २०२४-२५ मध्ये डी. वाय. पाटील फिजिओथेरपी कॉलेज नवी मुंबई येथून न्यूरो फिजिओथेरपीमध्ये मास्टर डीग्री पूर्ण करताना विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले. त्याबद्दल त्यांचा पेन तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अध्यक्ष रामदास पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल त्यांनी पेण तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com