वृक्षलागवडीसाठी रोपांची मागणी वाढली

वृक्षलागवडीसाठी रोपांची मागणी वाढली

Published on

वृक्षलागवडीसाठी रोपांची मागणी वाढली
अलिबाग, ता. २५ (वार्ताहर) ः पावसाळा सुरू झाल्याने नर्सरी व्यावसायिकांसाठी चांगले दिवस आले आहेत. पावसाळ्यात मुबलक पाणी मिळत असल्याने झाडे जगवण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ठिकठिकाणी राजकीय नेते, सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपणासाठी उपक्रम राबविले जातात. यामुळे पावसाळाच्या दिवसांत विविध प्रकारच्या रोपांची मागणी वाढते. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नर्सरी व्यावसायिकांकडे मोठी उलाढाल होते.
सध्याचे वाढते प्रदूषण, जमिनीची होणारी धूप, सातत्याने हवामानात होणारे बदल यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे बनले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जात आहे. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या पाण्याची उपलब्धता जास्त असल्याने झाडे चांगली वाढतात. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा पावसाळाच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाते. त्याचप्रमाणे हल्लीच्या काळात लग्नसमारंभ, एखाद्या सामाजिक, सार्वजनिक, शासकीय कार्यक्रमातही एखादे फुलाचे, फळाचे किंवा तुळशीचे रोप भेट म्हणून दिले जाते. त्यामुळे वर्षभर नर्सरीतील रोपांना मागणी सुरू असते, मात्र पावसाळ्यात ही मागणी वाढते. अलिबाग तालुक्यात तळवली, ढोलपाडा, खंडाळा यांसारख्या ठिकाणी मोठ्या नर्सरी असून, शहरातील काही ठिकाणी लहान नर्सरी आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा कार्यक्रम असल्यास अशा वेळी चिकू, आंबा, पेरू, पपई यांसारख्या फळझाडांची रोपे घेतली जातात, तर एखाद्या कार्यक्रमात भेट म्हणून देण्यासाठी लहान फुलझाडे अथवा भरपूर ऑक्सिजन देणारे तुळशीचे रोप संस्था घेतात, असे नर्सरी व्यावसायिकांनी सांगितले. यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत हजारोंची उलाढाल होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पावसाच्या पाण्यामुळे मातीतील पोषकतत्त्वे वाढतात, ज्यामुळे झाडांची चांगली वाढ होण्यास मदत होते. पावसाळ्यात झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे नर्सरीतून रोपांची मागणी वाढते. यामुळे नर्सरी व्यावसायिकांना चांगला नफा मिळतो. अनेक हौशी नागरिकही आपल्या बागा आणि परसबागांसाठी विविध प्रकारची झाडे घेतात. नर्सरींमध्ये विविध प्रकारची झाडे, फुलझाडे, फळझाडे आणि भाजीपाला रोपे उपलब्ध असल्याने, नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार निवड करता येते.
........................
चैकट :
अशी राखली जाते झाडांची निगा :
नर्सरीमध्ये वर्षार झाडांची योग्यप्रकारे निगा राखली जाते. यामध्ये नियमितपणे आणि योग्य प्रमाणात पाणी देणे हे महत्त्वाचे ठरते. पावसाळ्यात पाण्याची गरज कमी असते. मातीची नियमितपणे तपासणी करून, आवश्यकतेनुसार खत आणि पोषकतत्त्वे दिली जातात. झाडांच्या चांगल्या वाढीसाठी सेंद्रिय खत आणि रासायनिक खत दोन्ही वापरले जातात. खतांचा वापर झाडाच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार केला जातो. झाडांना त्यांच्या गरजेनुसार सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवले जाते. झाडांना कीड आणि रोगांपासून वाचवण्यासाठी नियमितपणे कीटकनाशके वापरली जातात. नियमित तपासणी करून, कीड-रोगग्रस्त झाडांवर त्वरित उपचार केले जातात. झाडांना आधार देण्यासाठी, त्यांना काठी किंवा इतर साहित्याचा वापर करून बांधले जाते. तसेच झाडांची नियमित साफसफाई केली जाते.
...............
वर्षभर रोपांची विक्री सुरू असते, मात्र पावसाळयाच्या दिवसांत ही मागणी वाढते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाते. त्यामुळे या दिवसांत आंबा, चिकू, पपई, पेरू यांसारखी फळझाडे घेण्यास मोठ्या संख्येने नागरिक तसेच अनेक सामाजिक संस्थाही येत असतात. त्यामुळे या काळात आम्हाला चांगला नफा मिळतो.
- आकाश पाटील, सारा नर्सरी, तळवली, अलिबाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com