संविधानाचे जतन करणे आवश्यक : अभिनव गोयल
संविधान हे जिवंत दस्तऐवज : अभिनव गोयल
संविधान रॅलीत विद्यार्थ्यांचा सहभाग
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : संविधान हे जिवंत दस्तऐवज म्हणून सर्वांनीच त्याचे जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी बुधवारी (ता. २५) केले. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अत्रे रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संविधानाने आपल्याला अनेक प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे, हे स्वातंत्र्य असले तरी काही बंधने आणि सीमा आपण नागरिक म्हणून पाळल्या पाहिजेत. आणीबाणीच्या कालावधीत घडलेल्या घटनेनंतर संविधान व लोकशाही अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे आजच्या या आणीबाणीच्या वर्धापनदिनी आणीबाणीच्या काळात ज्यांनी लढा दिला, त्यांचे स्मरण करणे हे गरजेचे आहे, असेही ते पुढे म्हणाले.
आचार्य अत्रे रंगमंदिराच्या तळमजल्यावर प्रदर्शित केलेल्या आणीबाणीविषयक चित्रांच्या प्रदर्शन आणि डिजिटल स्टॅन्डीवरील माहितीपर छायाचित्रांचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. आणीबाणीचा वर्धापनदिन म्हणजे संविधानाबाबतची आस्था, लोकशाहीचा जागर आणि राष्ट्राबाबतचे प्रखर प्रेम दर्शविण्याचा दिवस होय, असे उद्गार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी या वेळी आपल्या भाषणात काढले. या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते, संविधानाचे अभ्यासक माधव जोशी यांनी संविधानाने दिलेले हक्क आणि आपली कर्तव्ये याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आणीबाणीचा कालावधी हा एक काळा कालखंड आहे. आणीबाणीच्या लढ्यात कल्याण-डोंबिवलीतील काही नागरिकांनीदेखील हिरिरीने सहभाग घेतला होता. आपली राजवट ही प्रजासत्ताक राजवट आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे आपण सार्वभौम आहोत. स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या व्यक्तींचा सन्मान करणे आवश्यक आहे, असे म्हटले.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य लेखा परीक्षक लक्ष्मण पाटील, उपआयुक्त तथा या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संजय जाधव, उपआयुक्त रमेश मिसाळ, समीर भुमकर, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, जगदीश कोरे, रोहिणी लोकरे, शैलेश कुलकर्णी, शैलेश मळेकर, अशोक घोडे व्यासपीठावर उपस्थित होते.
जनजागृती रॅली
सकाळी काढण्यात आलेल्या संविधान जनजागृती रॅलीत आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपआयुक्त तथा या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संजय जाधव, उपायुक्त रमेश मिसाळ, समीर भुमकर, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, महापालिका सचिव किशोर शेळके तसेच महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी आणि महापालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
देशभक्तीपर नृत्याचे सादरीकरण
आणीबाणीच्या ५०व्या वर्धापनदिनी महापालिका परिक्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केलेले मनमोहक, देशभक्तीपर नृत्याचे सादरीकरण, देशभक्तीपर सुरेल गीत तसेच महापालिकेतील दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीताने अत्रे रंगमंदिराचे सभागृह देशप्रेमाने भारून गेले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.