४०० कोटी अमली पदार्थ जप्त
४०० कोटी अमली पदार्थ जप्त
रायगड पोलिसांची तीन वर्षांतील कारवाई; तस्करी रोखण्याचे कडवे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : तरुणाईमध्ये अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रायगड जिल्ह्यात तीन वर्षांत तब्बल ४०० कोटींहून अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वर्षभरात एमडी, गांजा, चरस अशा अमली पदार्थांच्या तस्करीच्या अनेक घटना रोहा, खालापूर, पनवेल परिसरात उघड झाल्या आहेत.
गतवर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्जतमध्ये एका बनावट सिगारेट फॅक्टरीवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यात लहान-मोठ्या कारवाया सुरूच आहेत. मुंबई, पुण्यासारखी मोठी शहरे जवळ असल्याने या शहरांमध्ये पुरवठा करण्यासाठी रायगडमधील अमली पदार्थांचे अड्डे तयार करण्यात आले. विशेषत: कर्जत, खालापूर, पेण येथील दुर्गम भागात हे अड्डे कार्यरत होते.
या ठिकाणावरून अमली पदार्थांबरोबच बंदी घातलेल्या तंबाखूजन्य वस्तूंचा साठा केला जात असल्याचे आतापर्यंत झालेल्या कारवायांमध्ये दिसून आले आहे; मात्र या प्रकरणांमधील मुख्य आरोपींचा शोध रायगड पोलिसांकडून सुरू आहे.
नववर्षांच्या स्वागतासाठी होणाऱ्या विशेष पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांची छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात तस्करी होते. हे प्रकार रोखण्यासाठी रायगड पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाते. कर्जत, खालापूर, अलिबाग, दिवेआगर येथे मुंबई-पुण्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. येथील हॉटेल, फार्महाउसमध्ये रात्रभर पार्ट्या चालतात. आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये मेफेड्रॉन, गांजा आणि चरस या अमली पदार्थांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातून परदेशातही अमली पदार्थांची तस्करी सुरू झाल्याची धक्कादायक बाब खालापूर तालुक्यात कारवाईनंतर समोर आली होती. याठिकाणी अमली पदार्थ तयार करणारा बेकायदा कारखानाच सुरू असल्याचे उघडकीस आले होते. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर अफगाणी चरसची पाकिटे वाहून आली होती, या घटनेवरून रायगड जिल्ह्यात सागरी मार्गाने अमली पदार्थाची तस्करी सुरू असल्याचेही उजेडात आले होते.
तस्करीसाठी सागरी मार्गाचा वापर
अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील किनाऱ्यावर ही पाकिटे सापडली होती. यामध्ये एक किलो १०० ग्रॅमच्या १८५ पाकिटांचा समावेश होता. ज्याची किंमत आठ कोटी २५ लाख ११ हजार रुपये होती. याप्रकरणी अलिबाग, रेवदंडा, श्रीवर्धन पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले. पोलिस यंत्रणेसह, केंद्रीय तपास यंत्रणांनी चरस प्रकरणाचा तपास सुरू केला होता; पण तरीही पाकिटे कुठून आली, याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील ढेकू येथे एका इलेक्ट्रिक खांब बनवण्याच्या कारखान्यात मेफेड्रॉन अर्थात एमडी हा प्रतिबंधित अमली पदार्थ तयार केला जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी धाड टाकून ८५ किलो वजनाचे १०७ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते.
अमली पदार्थविरोधी दिनाचे महत्त्व
लोकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करण्यासाठी तरुण मंडळी, किशोरवयीन मुलांमधील अमली पदार्थांचे व्यसन रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. तरुणाईसह किशोरवयीन मुलांमध्येही अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ७ सप्टेंबर १९८७ पासून ‘संयुक्त राष्ट्र संघा’कडून अमली पदार्थमुक्त करण्याचा अहवाल सादर केला गेला आणि २६ जूनला आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांविरुद्ध दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. याला बहुतांश देशांनी मान्यताही दिली असून तेव्हापासून दरवर्षी २६ जून ‘जागतिक अमली पदार्थविरोधी दिन’ साजरा केला जातो.
तरुणाईमध्ये अमली पदार्थांचा वापर वाढला आहे. ज्या वयात करिअर करायचे असते, त्या वयात ते व्यसनाधीन होतात. तरुण पिढीला व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. रायगड जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये यानिमित्ताने विशेष जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
- अभिजित शिवतरे, अपर पोलिस अधीक्षक, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.