आणीबाणीला सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचे समर्थन
आणीबाणीला सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचे समर्थन
भाजपला देवरसांची भूमिका मान्य नाही का? : हर्षवर्धन सपकाळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : ‘देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिरा गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. या दरम्यान झालेल्या चुका इंदिरा, सोनिया व राहुल गांधी यांनी मान्य केल्या आहेत. पण भाजप आणीबाणीवर फक्त कांगावा करीत आहे.’ दिवंगत सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते याची आठवण करून देत भाजपला बाळासाहेब देवरसांची भूमिका मान्य नाही का, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
टिळक भवन येथे बुधवारी (ता. २५) झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ‘इंदिरा गांधी यांनी आणीबाणीवेळी देशाची संपत्ती विकली नाही, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपतींच्या घशात घातल्या नाहीत; पण देशात मागील ११ वर्षांपासून अघोषित आणीबाणी सुरू आहे. विमानतळ, बंदरे, खाणी, बँका, सरकारी जमिनी लाडक्या उद्योगपतीला विकल्या जात आहेत.’ ‘राहुल गांधी यांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात आठ टक्के मतदार वाढल्याचे सांगितले. तिथले काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी ‘आरटीआय’मधून मागवलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले. विशिष्ट मोबाईल नंबरवरून अनेक मतदारांची नोंद केल्याचेही स्पष्ट झालेले आहे. यासंदर्भात न्यायालयात दोन याचिकाही दाखल केलेल्या आहेत. या मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावरून दूर राहावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
..
आणीबाणी विशेषांक
काँग्रेस पक्षाचे मुख्यपत्र जनमानसाची शिदोरी या मासिकाचा आणीबाणी विशेष अंक काढला आहे. या अंकात इंदिरा गांधी, पुपुल जयकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ लेखकांनी लेख लिहिले आहेत. आणीबाणीसंदर्भातील सत्य लोकांसमोर आणले जाणार असून, भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर मिळेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

