चौकातील सीसीटीव्हीचे एक्सेस मिळेना

चौकातील सीसीटीव्हीचे एक्सेस मिळेना

Published on

तांत्रिक बिघाडामुळे सीसीटीव्ही बंद
गुन्ह्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अडथळा

कल्याण, ता. २५ (बातमीदार) : काही वर्षांपूर्वी महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत लाखो रुपये खर्च करून चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत; मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे ठरावीक कॅमेऱ्यांचा एक्सेस मिळत नसल्याने चोरीच्या घटनांचा शोध घेण्यास पोलिसांना अडथळा ठरत आहे. चोरी, लुटमारीसारख्या गुन्ह्यांचा तपास करताना हे कॅमेरे पोलिसांचा तिसरा डोळा ठरतात; मात्र काही वेळेस तांत्रिक अडचणींमुळे चोरांना शोधण्याचे काम अडचणीचे ठरत आहे.

अनुचित प्रकार, अपघात, चोरी अशा प्रकारची घटना घडली तर तपासासाठी पोलिस यंत्रणेला चौकाचौकातील सीसीटीव्हीची मदत होते. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांनी आतापर्यंत अनेक गुन्हेगारांचा तसेच घडलेल्या घटनांचा यशस्वीपणे शोध घेतला आहे, परंतु आता तांत्रिक बिघाडामुळे पोलिसांना तपास करणे जिकिरीचे बनू लागले आहे. सोमवारी (ता. २३) रात्री कल्याण पूर्व गुंजाई चौकातील एक बंद पानटपरी फोडून तिच्यातील रोख रक्कम आणि काही वस्तूंची चोरी झाल्याचे मंगळवारी सकाळी निदर्शनास आले होते. याबाबत कोळसेवाडी पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराने गुंजाई चौकातील महापालिकेने या चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्याची पोलिसांना विनंती केली होती; मात्र तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या.

कायमस्वरूपी २४ तास रहदारी असलेला पुणे लिंक रोड हा अनेक चौक आणि अंतर्गत रस्त्यांना जोडला गेलेला आहे. उल्हासनगरला जोडून श्रीराम चौकातून सुरू झालेल्या या मार्गावर चक्कीनाका या मुख्य चौकापर्यंत रेल्वेस्थानक, एसटीस्थानक, असंख्य रिक्षास्थानके, पोलिस ठाणे, रहिवासी व व्यापारी संकुले, शोरूम, छोटी मोठी दुकाने, हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल सह स्थानिक आमदारांचे जनसंपर्क कार्यालय तसेच महापालिकेचे प्रभाग क्षेत्र कार्यालयदेखील आहे. त्यामुळे हा मार्ग कल्याण पूर्वेतील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच मार्गावर सतत अपघात, चोरी आणि अनुचित प्रकारदेखील घडत असतात. असे असताना आता अशा प्रकारे महापालिकेचे सीसीटीव्हीचे एक्सेस जर पोलिसांना मिळत नसतील, तर या कॅमेऱ्यांचा उपयोग तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com