खेळाची मैदाने वाचवण्यासाठी ठाणेकर मैदानात
मैदानांसाठी ठाणेकरांचा लढा
ठाणे सिटिझन्स फाउंडेशनकडून न्यायालयात जनहित याचिका
ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) ः तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात १०४ खेळांची मैदाने आहेत. दरम्यान, ही मैदाने विकसक, व्यापाऱ्यांना आंदण दिली आहेत. ठाणे महापालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ठाण्यात मुलांना खेळण्यासाठी एकही मैदान शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीत राहणाऱ्या ३६ लाख ठाणेकरांच्या लहान मुले आणि तरुणांवर घरात बसून मोबाईलवर खेळणे अथवा पबसारख्या चुकीच्या ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे. ठाण्यात खेळाडू तयार व्हावेत, यासाठी ठाणे सिटिझन्स फाउंडेशनने सर्व प्रकारची शासकीय स्तरावरील लढाई लढली असून, हाती आलेल्या नैराश्यापोटी अखेर मैदाने वाचवण्यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाईचे शस्त्र उपसले आहे.
मुलांना टीव्ही आणि मोबाईलपासून दूर ठेवा, त्यांना खेळण्यासाठी मैदानात पाठवा, त्यातून मैदानी खेळाडू तर घडतीलच परंतु चांगले आरोग्यदेखील घडेल, असे सल्ले मुलांना दिले जातात. यासाठी मुलांना राखीव मैदानेदेखील ठेवली जातात. महापालिकेनेदेखील ठाणेकरांसाठी १०४ मैदाने राखीव ठेवलेली आहेत, परंतु ही मैदाने विकसकांच्या घशात गेली आहेत. अनेक मैदानांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झालेले आहे, तर काही दुर्लक्षित असल्याने तेथे कचरा, गटाराचे पाणी आणि झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे.
ठाण्यातील नागरिकांच्या हक्काची खेळाची मैदाने वाचवण्यासाठी ठाणे सिटिझन्स फाउंडेशन पुढे आली असून, त्याकरिता २०१४ पासून शासकीय स्तरावरील लढाई लढत आहे. ठाणे महापालिकेपासून थेट क्रीडामंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचा हा लढा सुरू आहे. या लढ्यामध्ये यश येताना दिसत नसल्याने अखेरीस त्यांनी याविरोधात ठाणे महापालिका आणि राज्य सरकारविरोधात ठाणे न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे ठाण्याचा स्मार्ट सिटी म्हणून विकास होत असताना दुसरीकडे मात्र मैदानाविना ठाणेकरांचे आरोग्य संकटात सापडलेले दिसत आहे. क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार प्रत्येक वसाहतीमध्ये खेळाचे मैदान असणे आवश्यक आहे. त्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेनेदेखील १०४ ठिकाणी मैदानांची जागा आरक्षित केली आहे. दरम्यान, त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे ही मैदाने अतिक्रमण करणाऱ्यांनी घशात घातली आहेत. ठाणे महापालिकेने जाणीवपूर्वक मैदानाभोवती संरक्षण भिंती उभ्या केल्या नसल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले. यामुळे मैदाने प्रचंड प्रमाणात कमी झाली आहेत.
देखभालीचा खर्च परवडत नाही
देखभालीचा खर्च परवडत नाही, असे कारण पुढे करून ठाणे महापालिकेने काही मैदाने खासगी व्यावसायिक, संस्थांना दिली आहेत. त्यांच्याकडून मैदाने लग्न, पार्ट्या, मोठे समारंभासाठी भाड्याने दिली जातात. खेळाचा उद्देश बाजूला ठेऊन मोठा नफा कमावला जात आहे.
न्यायालयात जनहित याचिका
ही १०४ मैदाने अतिक्रमणमुक्त करावीत, खासगी संस्थांच्या ताब्यातून परत घ्यावीत आणि त्यांची योग्य दुरुस्ती करून ती ठाणेकरांच्या वापराकरिता खुली करावीत. ठाणे महापालिकेला तिच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागत असल्याचे ठाणे सिटिझन्स फाउंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टिन यांनी म्हटले आहे.
ठाण्यात कबडी, हॉलीबॉल, खो खो यांसारखे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्येक प्रभागातील मैदान तेथील स्थानिक नागरिकांना खेळण्यासाठी असते, मात्र ही स्थानिक मैदाने शोधून दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे म्हणण्याची वेळ अली आहे.
- कॅस्बर ऑगस्टिन, अध्यक्ष, ठाणे सिटिझन्स फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.