

भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : मिरा-भाईंदरची सूर्या धरण पाणी योजना कार्यान्वित होण्याचा मुहूर्त पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. प्रकल्पाला आवश्यक असलेला वीजपुरवठा होण्यास डिसेंबर महिना उजाडणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सुरू होण्यास आणखी दीड ते दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे मिरा-भाईंदरला सूर्याचे पाणी मिळण्यासाठी पुढील वर्षीचा मार्च महिना उजाडणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या आधी हे पाणी ऑक्टोबर महिन्यापर्यंत मिळेल, असे सांगण्यात आले होते.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदर महापालिकेत विकास कामाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (ता. २५) बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सूर्या धरण पाणी योजनेची माहिती विचारली. त्या वेळी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला आवश्यक असलेला १३२ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा देण्याचे काम डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर एक ते दीड महिना अन्य तपासण्या पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरला प्रत्यक्ष पाणी मिळण्यासाठी पुढील वर्षीचा मार्च महिना उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले. या आधी वीजपुरवठ्याचे काम पूर्ण करून सूर्याचे पाणी यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, हा मुहूर्त आता आणखी चार ते पाच महिने पुढे जाणार आहे.
डहाणू येथील सूर्या नदीतून मिरा-भाईंदरला २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. त्यासाठी सुमारे ९० किमी लांबीची जलवाहिनी अंथरण्यात येत आहे. या व्यतिरिक्त वसई खाडी ओलांडून हे पाणी मिरा-भाईंदरपर्यंत आणण्यासाठी बोगदा खणण्याचे काम सुरू आहे. ही योजना एमएमआरडीए राबवत असून, सर्व कामे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण होतील, असे एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी नदीवरील कवडास येथील उदंचन केंद्राला १३२ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा आवश्यक आहे. त्यासाठी विजेचे खांब टाकण्याचे काम सुरू आहे. एकंदर १५३ पैकी १०३ खांब टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित खांब टाकून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी डिसेंबर महिना उजाडेल, असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर जलवाहिन्यांची तपासणी आणि अन्य तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी एक ते दीड महिना आवश्यक आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मिरा-भाईंदरला हे पाणी पुढील वर्षीच मिळणार, हे नक्की झाले आहे.
नव्या इमारतीमधील रहिवासी नळजोडणीच्या प्रतीक्षेत
मिरा-भाईंदरला सध्या मिळणारे पाणी कमी पडत असल्याने आयुक्तांनी बहुमजली इमारतींना नवीन नळजोडणी देणे बंद केले आहे. केवळ चार मजल्यापर्यंतच्या इमारतींना नळजोडणी दिली जात आहे. सूर्या पाणी योजना कार्यान्वित होत नाही तोपर्यंत नवी नळजोडणी न देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. सध्या मिरा-भाईंदरमध्ये बांधण्यात येणाऱ्या सर्वच इमारती बहुमजली आहेत. या इमारतींना नळजोडणी मिळत नसल्याने तेथील रहिवाशांना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ऑक्टोबरपर्यंत सूर्याचे पाणी मिळेल आणि त्यानंतर दिवाळीपर्यंत नळजोडण्या देणे सुरू होईल, अशी अपेक्षा रहिवाशांना होती. मात्र, सूर्याचे पाणी मिळण्यास पुन्हा एकदा उशीर होत असल्याने नव्या इमारतीमधील रहिवाशांचा चांगलाच हिरमोड होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.