बोगस मतदानाचे दावे हे हास्यास्पद

बोगस मतदानाचे दावे हे हास्यास्पद

Published on

बोगस मतदानाचे दावे हास्यास्पद
विधानसभेबाबत उच्च न्यायालयाचे निरीक्षण; आव्हान याचिका फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ नंतर सुमारे ७५ लाख मतदारांचे मतदान झाले हाेते. यावर आक्षेप घेऊन प्रत्यक्ष मतदान आणि मिळालेल्या मतांत तफावत असून, बाेगस मतदान झाल्याचा दावा करून विधानसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. २५) फेटाळली. याचिकेतील दावे हे नैराश्यातून केले असून ते हास्यास्पद आहेत, असे निरीक्षणही न्यायालयाने या वेळी नोंदवले आहेत. 
वंचित बहुजन आघाडीसह विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारे विक्रोळीतील चेतन अहिरे यांनी याचिका केली होती. निवडणुकीदरम्यान बाेगस मतदान झाल्याबाबत ठोस आणि प्रामाणिक पुरावे, माहिती सादर करण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले. याचिकाकर्त्याने विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे विधानसभेच्या संपूर्ण निवडणुकांवर प्रश्न उपस्थित करण्याचा याचिकाकर्त्यांना अधिकार कसा असू शकतो, असा प्रश्न उपस्थित करून याचिकाकर्त्याच्या मागणीवर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या शुद्धतेवर विशेषतः इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) संदर्भात केलेले दावे हास्यास्पद असल्याचे आणि ही याचिका नैराश्यातून करण्यात आल्याचा पुनरुच्चार खंडपीठाने केला.
याचिकेत ईव्हीएम प्रणालीऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याच्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करण्याची मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन त्यात ईव्हीएमचा वापर कायदेशीर आणि वैध ठरवण्यात आल्याचे खंडपीठाने लक्षात आणून दिले. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात विशेषतः सायंकाळी ६ वाजल्यानंतर मतदानाबाबत कोणताही गैरप्रकार, फसवणुकीची कोणतीही तक्रार केल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी सादर केलेली नाही. त्यामुळे केवळ राजकीय मतांवर किंवा वृत्तपत्रांच्या वृत्तांवरून केलेली याचिका स्वीकारता येणार नाही, असेही न्यायालयाने २७ पानी आदेशात स्पष्ट केले. 
----
युक्तिवाद काय?
- मतदानाच्या दिवशी शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. मतदान संपल्यावर सायंकाळी ६नंतर योग्य त्या चिठ्ठीशिवाय मतदारांना मतदान केंद्रांच्या आत सोडल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वतीने  वकील प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.
- मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल निवडणूक आयोगाकडे माहिती मागून ती दिली नाही. त्यामुळे उमेदवारांची निवड मुक्त आणि निष्पक्ष झाली नसून, ते बाेगस मतदान आणि फसवणूक करून निवडून आल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला होता.
- निवडणूक आयाेगाने ही याचिका केवळ संशयावर आधारित असल्याचा दावा केला हाेता. याचिकाकर्त्याने निकाल जाहीर झाल्यापासून ४५ दिवसांत निवडणूक याचिका दाखल करणे अपेक्षित होते; परंतु त्यांनी ती संधी गमावल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com