रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवा
रोहा, ता. २६ (बातमीदार) ः आपापसातील गैरसमजुतीमुळे अनेक महिन्यांपासून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती गठित करता येत नाही. या समितीच्या माध्यमातून आलेल्या निधीचा वापर करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जातो; मात्र पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम असल्याने विकासकामे करताना अडचणी निर्माण येत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवू नका. यासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र देऊन पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवण्याची मागणी करणार असल्याची माहिती राज्याचे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्तार कार्यकारिणीची सभा बुधवारी (ता. २५) रात्री किल्ला येथे पार पडली. या वेळी आदिती तटकरे बोलत होत्या. या वेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, ज्येष्ठ नेते शिवराम शिंदे, माजी उपसभापती रामचंद्र सकपाळ, शंकर भगत, कार्याध्यक्ष समीर शेडगे, शहर अध्यक्ष अमित उकडे, नंदकुमार म्हात्रे, माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा काफरे, महिला तालुकाध्यक्षा प्रीतम पाटील आदी उपस्थित होते. या वेळी समीर शेडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्राचे वाटप करण्यात आले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापसातील मतभेद बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा कशा पद्धतीने निवडून येतील, याकडे लक्ष द्यावे. आता निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यांना बळ आणि ताकद देण्याचे काम नेतेमंडळींचे आहे, म्हणून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने लोकसभा, विधानसभेपेक्षा या निवडणुकीत जातीने लक्ष घालणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.
मित्रपक्षांना मदत
रोहा तालुका हा श्रीवर्धन, पेण, अलिबाग या तीन विधानसभा मतदारसंघात विभागला आहे. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मला निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार पेण आणि अलिबाग मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्यापेक्षा कणभर सरस काम मित्रपक्षाच्या उमेदवारांचे केल्याचा उल्लेख आदिती तटकरे यांनी केला.
मतदारसंघासाठी १०० कोटींचा निधी
गत नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समीर शेडगे यांनी कडवी झुंज दिली आणि संतोष पोटफोडे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. याकरिता खासदार सुनील तटकरे यांनी कौशल्य पणाला लावून विजयश्री खेचून आणला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवून दिली, असे स्पष्ट विचार माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले. वर्षभरात खासदारांनी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून मतदारसंघाचा विकास साधल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
रोहा ः पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.