रबाळे रेल्वेस्थानक बनले कोंडवाडा
रबाळे रेल्वेस्थानक बनले कोंडवाडा
गळती, अस्वच्छतेमुळे प्रवासी हैराण; सुविधांचा बोजवारा
वाशी, ता. ८ (बातमीदार) ः आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र असणाऱ्या टीटीसी (ट्रान्स ठाणे क्रिक) इंडस्ट्रीयलमधील मुख्य झोन म्हणून आर झोन ओळखला जातो. आर झोन म्हणजेच रबाळे. ट्रान्स हार्बर मार्गावर कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणाऱ्या रबाळे रेल्वेस्थानकाला सध्या समस्यांचे ग्रहण लागले आहे. पावसाळ्यात गळती, अस्वच्छतेमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
रबाळे रेल्वेस्थानकातील पूर्वेकडे असणारे तिकीटघर काही दिवसांपूर्वी माजी खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू करण्यात आले, मात्र ही तिकीट खिडकी फक्त सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू असते. त्यानंतर मात्र प्रवाशांना रेल्वेस्थानकाला प्रदशिक्षणा घालून पश्चिमेला येऊन तिकीट काढावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
रबाळे रेल्वेस्थानकातील फलाटावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहिनी नादुरुस्त असल्याने भुयारी मार्गात पाणी साचते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. फलाटावरील पंखे बंदावस्थेत आहेत. रेल्वेस्थानकाच्या बाहेरील झोपडपट्टीमधील रहिवासी अनेकदा फलाटावर ठिय्या मांडून बसलेले असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना विशेषतः महिलांना मार्गक्रमण होताना असुरक्षित वाटते.
रबाळे रेल्वेस्थानकाच्या भुयारी मार्गामध्ये अस्वच्छता पसरली आहे. रेल्वेस्थानकातील इंडिकेटर कधी सुरू, तर बहुतांश वेळा बंदावस्थेत असतात. येथील पाणपोईमधील नळ तुटलेल्या अवस्थेत आहेत. रबाळे रेल्वेस्थानकामध्ये भटक्या कुत्र्यांचाही वावर असतो. रबाळे रेल्वेस्थानकात फक्त पूर्वेच्या एकाच बाजूस स्वच्छतागृह असल्याने प्रवाशांची विशेषतः महिला प्रवाशांची गैरसोय होते. येथील एमआयडीसीमध्ये मोठ्या संख्येने महिला कर्मचारी काम करतात, त्या तुलनेत स्थानकातील सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे.
प्रतिदिन तिकीटविक्री - ९ हजार
महसूल - दोन लाख ५० हजार
भुयारी मार्गाची दयनीय अवस्था
रबाळे रेल्वेस्थानकाच्या बाजूला भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे, मात्र या ठिकाणी सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना असुरक्षित वाटते. भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावर खड्डे पडल्याने प्रवाशांना कसरत करावी लागते.
रबाळे रेल्वेस्थानकालगत झोपडपट्टी असल्याने येथील येथील नागरिकांचा फलाटावर वावर असतो. रेल्वेस्थानकातील पाणपोईची दुरवस्था झाली आहे. रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या तुलनेत सोयीसुविधांचा अभाव जाणवतो. येथील वाहन पार्किंगही गैरसोयीचे आहे.
- श्यामसुंदर, प्रवासी
रबाळे रेल्वेस्थानकामधील समस्यांबाबत वारंवार सिडकोकडे पत्रव्यवहार केला आहे, मात्र सिडको प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वेस्थानकाला गळती लागली आहे. दैनंदिन स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
- देवी किशोर, स्थानक प्रबंधक, रबाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.