कल्याण अवती-भवती
कोळसेवाडी पोलिसांची व्यसनमुक्तीबाबत जनजागृती
कल्याण (बातमीदार) : जागतिक अमली पदार्थविरोधी दिन संपूर्ण जगभरात २६ जून रोजी साजरा केला जातो. यानिमित्त कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने, स्टडी वेव्ह बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून एक विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे व उमाकांत चौधरी यांच्या पुढाकाराने कल्याण पूर्वेतील विविध शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे व्यसन आणि त्याच्या दुष्परिणामांबाबत जागरूकतेसाठी प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन केले होते. या उपक्रमाअंतर्गत गुरुवारी विठ्ठलवाडी येथील कमलादेवी कॉलेज, कल्याण पूर्वेतील साकेत कॉलेज, मॉडेल शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्याने पार पडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांनी स्वतः या व्याख्यानांमध्ये मार्गदर्शन केले असून अमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे शारीरिक, सामाजिक आणि कायदेशीर दुष्परिणाम यावर सखोल माहिती दिली. तसेच, या दिनानिमित्ताने शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धाही आयोजित केली गेली. महापालिकेच्या शाळा व मॉडेल शाळेतील विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने काटेमानिवली ते कोळसेवाडी अशी फेरी काढण्यात आली होती. हातात फलक, घोषणांनी सजलेली ही फेरी अमली पदार्थविरोधी संदेश समाजात पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे. या जनजागृती मोहिमेमुळे नवयुवकांमध्ये अमली पदार्थांविषयी सजगता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
...............
‘संविधान सर्वांसाठी’ पुस्तकाचे प्रकाशन
डोंबिवली (बातमीदार) : आणीबाणी आणि नेते आणि कार्यकर्त्यांची केलेली धरपकड हे आपल्या लोकशाहीला लांच्छन होते. आपल्या संविधानाची मूलभूत चौकट असणाऱ्या मूलभूत हक्कांची ती मुस्कटदाबी होती. या काळ्या घटनेला बुधवारी (ता. २५) पन्नास वर्षे पूर्ण झाली. आणीबाणीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सर्व नागरिकांना आणि राज्यकर्त्यांना संविधानाची माहिती करून दिली पाहिजे. संविधानाची ओळख करून घेण्याची अनेकांची इच्छा असते; पण पुस्तकांचा आकार पाहिला की उत्साह मावळतो. यावर उपाय म्हणून लेखक माधव जोशी यांनी फक्त १२० पानांचे संविधान सर्वांसाठी हे पुस्तक लिहिले आहे. फ्रेंड्स लायब्ररीच्या फ्रेंड्स कट्ट्यातर्फे आयोजित कार्यक्रमात लेखक, अभिनेते दीपक करंजीकर आणि नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. आणीबाणीमध्ये मिसाखाली १९ महिने कारावास भोगलेले भा. य. लोहोकरे, सतीश मराठे, प्रकाश भुर्के, उमेश पटवारी यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी नवीन शिक्षण अभ्यासक्रमात हे पुस्तक समाविष्ट केले पाहिजे, असे करंजीकर म्हणाले.
....................
कल्याणमध्ये महामृत्युंजय जप
कल्याण (बातमीदार) : राज्यात सुरू असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे कल्याणमध्ये महामृत्युंजय जप करण्यात आला. २०२५ मध्ये कुंभमेळा, विमान आणि मुंब्रा रेल्वे अपघात या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महामृत्युंजय जप व हवनाचा अनोखा उपक्रम राबविला. नागरिकांचे सुख, शांती, दीर्घायुष्य तसेच काही सकारात्मक ऊर्जेसाठी हा धार्मिक उपक्रम राबवला होता. २०२५ हे वर्ष सुरू झाल्यापासून राज्यात व देशात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यात अनेक निरपराध, निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. ही स्थिती पाहता, येणाऱ्या काळात सर्व नागरिकांना स्थैर्य, सुख, शांती आणि दीर्घायुष्य लाभावे, यासाठी तसेच सकारात्मक ऊर्जेसाठी कल्याण पूर्वेतील विठ्ठल मंदिरात महामृत्युंजय जप व हवन करण्यात आले.
..............
केडीएमसीतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी अभिवादन
कल्याण (वार्ताहर) ः राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्त गुरुवारी (ता. २६) महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थित माहिती व जनसंपर्क विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, सुरक्षा अधिकारी भरत बुळे तसेच इतर कर्मचाऱ्यांनीदेखील राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.