हरिहरेश्वरमधील पोलिस चौकी बंदावस्थेत
वादळामुळे झाले नुकसान; सागरी सुरक्षेत अडचणी
श्रीवर्धन, ता. २८ (बातमीदार) ः तालुक्याला ५८ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर हरिहरेश्वर येथे ही पोलिस चौकी सुरू करण्यात आली होती; परंतु निसर्ग चक्रीवादळात पोलिस चौकीची मोडतोड झाली होती; मात्र तेव्हापासून चौकीची डागडुजी न झाल्याने ती बंद स्थितीत आहे. अमली पदार्थ तस्करी, पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता ही चौकी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
१९९३ रोजी मुंबई येथे झालेले १३ साखळी बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी येथे उतरवण्यात आले होते. त्यामुळे हरिहरेश्वर किनाऱ्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार १३ जुलै १९९६ रोजी पोलिस चौकी उभारण्यात आली होती. रायगड पोलिस अधीक्षक माधवराव कर्वे, श्रीवर्धन उपविभागीय पोलिस अधिकारी विजयसिंह जाधव, श्रीवर्धन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ फौजदार अशोक जांभळे यांच्या उपस्थितीत हरिहरेश्वर पोलिस चौकीचे उद्घाटन करण्यात आले होते. या पोलिस चौकीसाठी हरिहरेश्वर ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली होती; मात्र काही वर्षातच मनुष्यबळाअभावी पोलिस चौकी बंद झाली.
ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरू झालेल्या पोलिस चौकीच्या इमारतीला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला असून मोठे नुकसान झाले होते. माजी सरपंच अमित खोत आणि सुयोग लांगी तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वखर्चाने इमारतीची डागडुजी केली. यानंतर काही दिवस पोलिस चौकीत दोन कर्मचारी तैनात असायचे; मात्र चार वर्षांपासून मनुष्यबळाअभावी पोलिस चौकी बंद आहे. वापराविना इमारतीची दुरवस्था झाली असून मोडकळीस आली आहे.
काही वर्षांपूर्वी हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आली होती, तर काही दिवसांपूर्वी पर्यटक ज्या घरात राहिले, त्या घरमालकाच्या बहिणीशी असभ्य वर्तन करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. त्यामुळे हरिहरेश्वर येथील चौकीचे नूतनीकरण करून किमान दोन पोलिस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पोलिस चौकीसाठी ग्रामपंचायतीने जागा दिली आहे. पूर्वी येथे २४ तास कर्मचारी असायचे. त्यामुळे स्थानिकांना सुरक्षित वाटायचे; मात्र चक्रीवादळानंतर चौकीची दुरवस्था झाली. त्यानंतर स्वखर्चाने दुरुस्तीही केली होती; मात्र नंतर प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. पोलिस प्रशासनाने येथे पुन्हा कायमस्वरूपी कर्मचारी द्यावा, जेणेकरून हुल्लडबाज पर्यटकांवर लक्ष ठेवता येईल. वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिकांनाही मदत होईल. इथे एखादी अप्रिय घटना घडल्यास थेट श्रीवर्धन पोलिस ठाणे गाठावे लागते. त्यामुळे हरिहरेश्वरमधील पोलिस चौकी सुरू होणे आवश्यक आहे.
- सुयोग लांगी, माजी सरपंच, हरिहरेश्वर
हरिहरेश्वर हे एक महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटनस्थळ असल्याने वर्षभर वर्दळ असते. याठिकाणी चौकी कार्यान्वित असणे खूप गरजेचे आहे. चौकीच्या देखभालीचे नियोजन जिल्हा नियोजन आणि विकास निधी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे.
- आचल दलाल, पोलिस अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.