शिक्षण व्यवस्था ढासळली
शाळा धोक्याच्या उंबरठ्यावर
कल्याणमध्ये शिक्षक नाहीत, वर्गखोल्या नादुरुस्त
टिटवाळा, ता. २८ (वार्ताहर) : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात आणि ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा झाला. दुसरीकडे मात्र काही शाळांच्या भिंती भंगलेल्या, छप्पर गळके आणि शिक्षणाचा दर्जा ढासळल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ, गोवेली, खडवली, मामणोली, गुरवली, खोणी, दहिसर आणि सोनारपाडा या सात केंद्रांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण १३२ वर्गखोल्या आहेत. यातून २०० ते २३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; मात्र यातील सुमारे १०० वर्गखोल्या पूर्णपणे नादुरुस्त स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
गळके टेरेस, भिजलेल्या भिंती, उखडलेल्या लाद्या, सडलेले दरवाजे-खिडक्या, वाढलेले गवत, शौचालयातील फुटलेले पाईप आणि काही ठिकाणी तर वर्गातच लाकूडफाटा आणि पेंडा ठेवल्याचे प्रकार दिसून येतात. ही स्थिती शिक्षणासाठी नव्हे, तर धोक्याच्या सावलीत दिवस काढणाऱ्या मुलांच्या भविष्याचे दु:खद चित्र उभे करते. गुरवली केंद्रातील निंबवली शाळेची अवस्था तर अत्यंत भयावह आहे. अवघ्या दोन-तीन वर्षांपूर्वी नव्याने बांधलेल्या स्लॅबच्या शाळेत आज ‘ठिबक सिंचन’ सुरू आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. छताचे प्लॅस्टर कोसळलेले आहे, भिंती सतत ओल्या असून इमारत वापरण्यास धोकादायक बनली आहे. काही इमारतींच्या समोरील भागच फुटलेला असून, लाद्याही उखडलेल्या आहेत. ही अवस्था पावसाळ्याच्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारी आहे.
धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कल्याण तालुका अध्यक्ष किरण केणे यांनी याप्रकरणी ठेकेदार, शिक्षणाधिकारी व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी लाखोंचा निधी मंजूर होतो, कामे केली जातात असा देखावा केला जातो; मात्र खरे चित्र वेगळेच आहे, असे त्यांनी म्हटले. केवळ कल्याण तालुका नव्हे, तर शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांतील अनेक शाळांमध्येही अशीच भयावह स्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. चौरे, उशीद, कांबा, बेहरे, मांजर्ली, म्हसकळ, नडगाव, दहागाव, ठाकूरपाडा, राये अशा भागांतील शाळांमध्येही ढासळलेल्या सुविधांमुळे शिक्षण म्हणजे एक दिव्य बनले आहे.
...तर परिणाम गंभीर!
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शाळांच्या दुरुस्तीची मोठी यादी तयार केली जाते. लाखो रुपयांचे प्रस्ताव मंजूर होतात, मात्र दर्जेदार कामाऐवजी ढिसाळपणा, निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार दिसून येतो. आता या गंभीर परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा उद्या एखादा अपघात शासनाच्या जबाबदारीवर कोसळल्याशिवाय राहणार नाही.
शिक्षणमंत्र्यांना निवेदन
गुरवली शिक्षण केंद्रातील विनवली जिल्हा परिषद शाळेतील आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कल्याण तालुका अध्यक्ष किरण राम केणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन देत तातडीने शिक्षक भरतीची मागणी केली आहे. गेली १० वर्षे या शाळेत फक्त एकच शिक्षक कार्यरत आहे आणि दोन मंजूर पदे रिक्त आहेत. ७५-८० विद्यार्थी असूनही संपूर्ण अभ्यासक्रम एकट्याच शिक्षकावर अवलंबून आहे, ही स्थिती गंभीर आहे.
फौजदारी गुन्हे करण्याची मागणी
गुरवली येथीलच आणखी एका उदाहरणात नव्याने बांधलेल्या कौलारू इमारतीवर चुकीच्या पद्धतीने स्लॅब टाकल्याने संपूर्ण इमारत जणू मृत्यूच्या सावलीत उभी आहे. धर्मवीर ट्रस्टने अशा दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे. कल्याण तालुक्यातील या परिस्थितीचा विचार करता शासनाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जाईल आणि ही उदासीनता उद्याच्या अपघाताचे कारण ठरेल.
याबाबत नुकताच अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेल्या गटशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांना विचारणा केली असता, ‘मी नुकताच अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे मला पूर्ण विषयाची कल्पना नाही. शिक्षणाधिकारी राक्षे (ठाणे) यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, याबाबत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोमवारी बीडीओ संजय भोये यांच्याशी विचारविनिमय करून संबंधित सर्व शाळांचा पाहणी दौरा लवकरात लवकर आयोजित करून या कामाचे इंजिनिअर पवार यांच्याकडून याबाबतचा अहवाल मागवण्यात येईल. ही दुरवस्था, त्याची कारणे याचा सविस्तर अहवाल, आधीची कागदपत्रे मागवली आहेत.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.