वसई-विरार पालिकेच्या रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा

वसई-विरार पालिकेच्या रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा

Published on

वसई-विरार पालिकेच्या रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा
एफडीएकडून संबंधित कंपन्यांवर गुन्हा दाखल
बोळिंज, ता. २९ (बातमीदार) : वसई-विरार शहर पालिकेच्या आरोग्य विभागाला बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या सातिवली येथील माता-बाळ संगोपन रुग्णालयातील औषधांची तपासणी केली असता बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे.
बनावट औषधांच्या पुरवठ्याचा एक मोठा घोटाळा असून, यामध्ये आंतरराज्यातील रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता एफडीएने व्यक्त केली असून, याप्रकरणी वालीव पोलिस ठाण्यात बहुजन विकास आघाडीचा मेडिकल विभाग पालघर जिल्हा सचिव अनिस शेख याच्यासह वसई पूर्वच्या सातिवली येथील मे. श्री. श्याम फार्माचे श्रवण पुखराजजी दाबी, मे. श्री. गणेश फार्मा ॲण्ड सर्जिकल एलएलपीचे मयंक हरखानी, भिवंडीच्या मे. ॲक्टीवेन्टीज बायोटेक प्रा. लि.चे मिहिर त्रिवेदी, मिरा रोड येथील मे. कॅबीज जनरीक हाउसचे विजय शैलेंद्र चौधरी आणि वसई पश्चिमेकडील वरूण नितीन मोदी व नितीन ताराचंद मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बनावट औषधांचा पुरवठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजय चौधरी हा दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये सध्या नागपूरच्या तुरुंगात असूनही तो हे रॅकेट चालवतो. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बनावट औषधे पुरवणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील यांनी केली असून, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अशी आली माहिती समोर
पालघरच्या अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सतीश चव्हाण यांनी वसईच्या वालीव पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात एक भयंकर मोठा मेडिकल घोटाळा उघडकीस आला आहे. वसई-विरार शहर महापालिकेच्या सातिवली येथील माता बाळ संगोपन रुग्णालयातील औषधांच्या तपासणीवेळी येथील काही औषधे बनावट असल्याचे उघड झाले आणि कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

बोगस पुरवठादारांकडून पालिकेची औषध खरेदी?
विजय चौधरी याची मिरा रोड येथील मे. कॅबीज जनरीक हाउस ही कंपनी अस्तित्वात नसल्याचे आणि सदर कंपनीचे परवाने रद्द केल्याबाबतची माहिती सहाय्यक आयुक्त (औषधे), ठाणे परिमंडळ २ यांनी सादर केली आहे. त्यामुळे जी कंपनी अस्तित्वातच नाही, तिच्या नावाने होणारा हा बोगस औषध पुरवठा, याची निर्मिती कोण करतो? याचे कोडे एफडीएच्या अधिकाऱ्यांना पडले आहे. अशा बोगस पुरवठादरांकडून वसई-विरार शहर महापालिका औषधांची खरेदी करते, हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com