शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार
कासा, ता. १ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी खते आणि बियाणे विक्री करताना होत असलेल्या आर्थिक फसवणुकीविरोधात भारताचा मार्क्सवादी-लेनिनवादी लाल बावटा पक्षाने उभारलेल्या नांगर मोर्चाला प्रशासन घाबरल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशीच पक्षाच्या शिष्टमंडळाला चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले. त्या वेळी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
शेतकऱ्यांना खते घेताना पावती न देणे, बियाणे घेतल्याशिवाय खते न देणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाईची मागणी करत मंगळवारी (ता. १) कृषीदिनी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, तालुका कृषी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देताच मोर्चा रोखण्यासाठी रविवारी बैठक घेतली. सुमारे चार तास चाललेल्या या चर्चेत जिल्हा सहसचिव काॅ. शेरू वाघ, तालुका कमिटी सदस्य काॅ. किरण डुबळा, काॅ. रामजी बरड, काॅ. वामन किंडरा, काॅ. राजू कवळी, काॅ. राजेश किडरा, काॅ. सुनील म्हसकर, काॅ. अरुणा मुकणे; तसेच लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा काॅ. सीता जाधव, काॅ. पार्वती पाडेकर यांचा सहभाग होता. चर्चेत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना व दुकानदारांना चांगलेच धारेवर धरले. या दरम्यान तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी उपस्थित होते.
शेवटी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. या निर्णयानंतर लाल बावटा पक्षाने नांगर मोर्चा तात्पुरता मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांचे विविध प्रश्न पूर्णपणे मार्गी लागले नाहीत, तर मोठ्या संख्येने नांगर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात पुढील आढावा बैठक ४ जुलैला होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, केलेली कारवाई आणि पुढील दिशा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
डहाणू तालुक्यातील कृषी दुकानातून शेतकऱ्यांना होणाऱ्या समस्यांबाबत दुकानदार आणि शेतकऱ्यांची एकत्र सभा घेतली. सभेत दुकानदारांना समज दिली आहे. यापुढे कोणत्याही कृषी दुकानात भातखरेदी, खतखरेदी याबाबतीत समस्या येणार नाहीत, याबाबतीत कृषी खाते लक्ष ठेवून असेल.
- अनिल नरगुलकर, कृषी अधिकारी, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.